Breaking news

कान्हे फाटा येथे भीषण अपघात: जनगणनेच्या शासकीय कामासाठी जाणाऱ्या शिक्षिकेचा कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू

लोणावळा : शासकीय कामासाठी दुचाकीवरून जात असलेल्या एका शिक्षिकेला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची हृदयद्रावक घटना कान्हे फाटा येथे घडली आहे. या भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला असून, दीपाली सुजित तांबे (वय अंदाजे, रा. मंचर) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे मंचर परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

       मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत दीपाली तांबे या मंचर येथील रहिवासी असून त्या व्यवसायाने शिक्षिका होत्या. सध्या त्यांच्यावर जनगणनेच्या शासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज (दि. २७) त्या नेहमीप्रमाणे जनगणनेच्या याच शासकीय कामासाठी आपल्या दुचाकी वाहनाने निघाल्या होत्या. मावळ तालुक्यातील कान्हे फाटा परिसरा जवळील महामार्गावरून जात असताना, एका भरधाव आणि अनियंत्रित कंटेनरने त्यांच्या वाहनाला पाठीमागून भीषण धडक दिली.

      अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्यांचा प्राण ज्योत मालवली होती. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवून तातडीने त्यांच्या नातेवाईकांना आणि पोलीस प्रशासनाला याबाबत सूचित करण्यात आले. देशाच्या आणि प्रशासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनगणनेच्या कामाचे कर्तव्य बजावण्यासाठी घरून निघालेल्या कर्तव्यदक्ष शिक्षिकेवर काळाने अचानक झडप घातल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एक सुविद्य आणि मनमिळावू शिक्षिका गमावल्याने मंचर परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

इतर बातम्या