Breaking news

कार्ला येथील संत रोहिदास तरुण मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान

लोणावळा : गणरायाच्या आगमन आणि उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक भान जपणाऱ्या कार्ला गावातील श्री संत रोहिदास तरुण मंडळाच्या वतीने यंदाही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम राखली आहे.

        श्री संत रोहिदास तरुण मंडळ दरवर्षी अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा करते. या मंडळाच्या गणपतीची स्थापना दीड दिवसांसाठी केली जाते. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने 'चांगदेव भेट' या अध्यात्मिक व नयनरम्य देखाव्याची उभारणी करण्यात आली होती, जी भाविकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. दीड दिवसाच्या उत्सवादरम्यान सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमानंतर गावातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची आवड वाढीस लागावी आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

        या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष अनिल पटेकर, उपाध्यक्ष ओंकार शिर्के, सचिव काशिनाथ फाटक यांच्यासह पोलीस पाटील संजय जाधव, उद्योजक प्रशांत हुलावळे, सचिन वाडेकर, ॲड. विशाल हुलावळे, दत्तात्रय जाधव, सुरेश जाधव, दिनेश जाधव, सुरज हुलावळे, स्वप्नील दळवी, अतिश हुलावळे, गणेश हुलावळे, कैलास हुलावळे आणि मंडळाचे इतर सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका जाधव व गायत्री जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दिनेश जाधव यांनी मानले.

इतर बातम्या