Lonavala News l मागील सत्ताधाऱ्यांच्या काळया कर्तृत्वाची यादी पुढील काळात उघड करणार… आरोप करताय.. आता आरोप सहन करण्याची ताकद सुद्धा ठेवा - धनंजय काळोखे
लोणावळा : लोणावळा शहरातील जनतेने ज्यांना नाकारले आहे त्यांनी फार फुशारक्या मारायची गरज नाही. आपत्कालीन परिस्थितीत राजकारण करताय, आरोप प्रत्यारोप करताय, हरकत नाही, त्यांच्या काळातील काळ्या कर्तृत्वाची यादी यापुढील काळात उघड केली जाणार आहेत. त्यामुळे पुढील काळात आरोप सहन करण्याची ताकद ठेवा असा हल्लाबोल आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे यांनी मागील काळातील सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
यावेळी पुढे बोलताना धनंजय काळोखे म्हणाले, आरोप करणाऱ्यांना प्रतिउत्तर देण्याची आवश्यकता नाही त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अपयश त्यांच्या जिव्हारी लागले आहे. या कारभाऱ्यांनी इतिकेवर्ष लोणावळ्यात सत्ता उपभोगत असताना काय कामे केली, 15 कोटीची भुयारी गटार योजना का फेल झाली. बिव्हिजी कंपनीचे काम समाधानकारक नसताना देखील त्यांची वकिली कोण करत आहे हे जनतेला माहिती आहे. आम्ही काम करतोय, नियोजनबध्द काम करत आहे. नदी नाल्यांवर जी अतिक्रमणे झाली आहेत ती कोणाच्या काळात झाली. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का झाली आहे अशा शब्दात आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे यांनी विरोधकांचा व मागील पंचवार्षिक काळातील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
बिव्हिजी कंपनीचे वकीलपत्र विरोधकांनी घेतले आहे का ? - धनंजय काळोखे
लोणावळा शहरात बिव्हिजी कंपनीला विरोध असताना त्या कंपनीला लोणावळा शहरात कोणी आणले हे जग जाहीर आहे. बिव्हिजी कंपनीने पावसापूर्व कामे योग्य प्रकारे केली नाही. नदी नाले सफाई झाली नाही, नदीतील जलपर्णी योग्य प्रकारे काढली नाही, काढलेली जलपर्णी उचलली गेली नाही. शहरात योग्य प्रकारे साफ सफाई बिव्हिजी कंपनी करत नाही म्हणून त्यांचे सहा महिन्याचे बिल थांबविण्यात आले आहे. असे असताना ज्यांनी बिव्हिजी कंपनीला लोणावळा शहरात आणले ते आता बिव्हिजी कंपनीचे बिल का थांबविले म्हणून ओरडत आहेत. त्यांनी बिव्हिजी कंपनीचे वकीलपत्र घेतले आहे का? त्यांना बिव्हिजी कंपनीकडून कमिशन दिले जाते का अशी शंका येत असल्याचा आरोप आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे यांनी विरोधकांवर केला आहे.
कोणाच्या जीवावर बेतणारे राजकारण करू नका.. आम्ही जनतेला मदत करत होतो व विरोधक लोकांना आमच्या अंगावर सोडत होते - देविदास कडू
लोणावळ्यात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. आजपर्यंत कधी झाला नाही एवढा पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवसात झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे लोणावळ्यात पूरस्थिती निर्माण झाली. त्यातच टाटा कंपनीने कोणतीही पूर्व कल्पना न देता लोणावळा शहरात पाणी सोडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीच्या काळात लोणावळा नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक दिवसरात्र एकत्र करत काम करत होते. नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करत असताना विरोधकांनी जीवावर बेतणार्या या बिकट परिस्थितीत विरोधकांनी राजकारण करत लोकांच्या आमच्या अंगावर सोडले. दोन-चार घमेली कचऱ्याची उचलत सर्व शहर आम्हीच साफ केला आहे असे अविर्भावात ते वागत आहेत. पावसाळापूर्व काही कामे प्रशासनाकडून झाली नाही हे आम्ही मान्य करत असताना देखील लोकांना या परिस्थितीला लोणावळा नगरपरिषद जबाबदार असल्याचे भरवून दिले असा आरोप उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी केला आहे.
टाटा कंपनीने पूरग्रस्तांचे दायित्व घ्यावे - निखिल कविश्वर
लोणावळा शहरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पूर परिस्थितीला टाटा कंपनी हीच जबाबदार असल्याने टाटा कंपनीने लोणावळा शहरातील पूरग्रस्तांचे दायित्व घ्यावे व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक निखिल कविश्वर यांनी केली आहे. टाटा कंपनीचा मान्सून लेक हा 100 वर्षापूर्वीचा आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोणतीही सुधारण झालेली नाही. धरणाची पाणी सोडण्याची चावी मागील 40 वर्षापासून बंद आहे. त्यांनी पूर्ण नदी आडवली आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी बारमाही वाहत नाही. ती चावी सुरू करावी तसेच डक्टलाईन दुरुस्ती कामे करावी. आमदार सुनील शेळके यांच्या सोबत टाटा कंपनीचे अधिकारी मदतीबाबत चर्चा करत आहेत, नागरिकांना समाधानकारक मदत न मिळाल्यास टाटा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निखिल कविश्वर यांनी दिला आहे.
लोणावळा शहरात पुन्हा पूर येणार नाही याकरिता टाटा कंपनीने उपाययोजना कराव्यात - जीवन गायकवाड
लोणावळा शहरामध्ये आतापर्यंत पाच वेळा पूर आला आहे. मात्र पुन्हा आता सहाव्यांदा पूर येणार नाही याकरिता टाटा कंपनीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पाणीपुरवठा समितीचे सभापती जीवन गायकवाड यांनी केली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरांमध्ये शाश्वत विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. येणाऱ्या काळामध्ये लोणावळा शहरामध्ये ही विकास कामे होत असताना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरामध्ये आजपर्यंत निर्माण झालेल्या पुर परिस्थितीला टाटा कंपनी जबाबदार आहे. भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत याकरता टाटा कंपनीने नगरपरिषदेला सहकार्य करावे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही कामे करताना चुका घडल्या त्यामुळे लोकांनी आमच्यावर रोष व्यक्त केला. नागरिकांनी व्यक्त केलेला रोष योग्य असून यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याकरिता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे भावना जीवन गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष लावण्यात सुरू करण्यात आली आहे - नगरध्यक्ष राजेंद्र सोनवणे
लोणावळा शहरात आजुन दोन महिने पावसाचे आहेत. पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास ही परिस्थिती हाताळण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून आमची पथके सज्ज असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले. लोणावळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नागरिकांना मदत करण्यासाठी आमचे प्रशासन तसेच बिव्हिजी कंपनीने महत्वाची भूमिका पार पाडली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोणावळा नगरपरिषद व प्रशासन यांनी नागरिकांची सेवा केली - दत्तात्रय येवले
लोणावळा शहरामध्ये अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये लोणावळा नगरपरिषद व प्रशासन यांनी नागरिकांची सेवा केली. कोण काय म्हणतो यापेक्षा आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा नगर परिषदेच्या सर्व टीमने नागरिकांना मदत केली. पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे लोणावळा शहरांमध्ये ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच टाटा कंपनीने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे लोणावळा धरणातील पाणी लोणावळा शहरांमध्ये येऊन नागरी वस्त्यांमध्ये आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी साचले गेले. यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याकरिता नियोजनबद्ध उपाय योजना करण्याचा मानस नगरसेवक दत्तात्रेय येवले यांनी व्यक्त केला आहे.
























