शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न; आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती

पवनानगर : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवार (दि. 30 एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर विविधा धार्मिक कार्यक्रमांसह व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. समस्थ ग्रामस्थ मंडळी शिळींब यांच्या माध्यमातून नूतन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी आयोजित कीर्तन सोहळ्यास आमदार सुनील शेळके यांनी देखील उपस्थिती दाखविली होती.
गेली दोन वर्षे ग्रामस्थ, देणगीदार, समाजातील अनेक दानशूर मंडळी आणि आमदार सुनील शेळके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या विशेष सहयोगाने ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचे मंदिर साकार झाले आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अत्यंत आकर्षक व सुंदर असून भाविकांच्या मनाला समाधान देणारे आहे. ग्रामदैवताच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे नियोजन समस्थ ग्रामस्थ मंडळी शिळींब यांनी केले. त्यानुसार मंगळवार (दि. 29) आणि बुधवार (दि. 30) अशा दोन दिवसीय कालावधीत अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
मंदिर कळसाची भव्य मिरवणूक
नूतन मंदिरावर बसविण्यात येणारे कळस खास अहमदनगर येथून घडवून आणले होते. या कळसांची मंगळवारी भव्य मिरवणूक गावाच्या वेशीवरून काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावातील महिला भगिनी डोक्यावर मंगल कशल घेऊन मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या, तर गावातील पुरुष मंडळी, लहान थोर, अबालवृद्ध सारेच मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात संपूर्ण गावातून कळस फिरवून भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
शुभमुहूर्तावर कलश रोहण
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सकाळी देवाचा महाअभिषेक संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रत्यक्ष मंदिराची वास्तूशांती आणि कलशारोहण होणार असल्याने सकाळपासूनच गावात चैतन्याचे वातावरण होते. देवाचा अभिषेक झाल्यानंतर ब्राह्मणवृदांच्या उपस्थितीत होमहवन आदी विधिवत वास्तूशांती करण्यात आली. त्यानंतर सुमुहूर्तावर मंदिराच्या कळसाच्या शिखरावर मंगल कलश स्थापित करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो कालभैरवनाथ भक्तांनी, नागरिकांनी 'नाथ सायबाच्या नावानं चांगलभलं'चा गजर केला.
विविध धार्मिक कार्यक्रम
मंदिराच्या शिखरावर मंगल कलश स्थापन केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित भाविकांना दुपारी महाप्रसाद वाटप केल्यानंतर नाथांचे भराड कार्यक्रम झाला, त्यानंतर हरिपाठ होऊन कीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला. जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवा महाराज बावस्कर यांची कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील भाविक, मंदिरास देणगी दिलेले देणगीदार, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, भाविक, वारकरी असे साधारण तीन हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. हभप शिवा महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक दंग झाले.
कीर्तन सोहळा संपन्न होत असताना आमदार सुनील शेळके यांचे आगमन झाले. आमदार सुनील शेळके यांनी जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु रात्री उशीरापर्यंत आमदार शेळके न आल्याने ग्रामस्थांचा हीरमोड झाला होता. परंतु कार्यक्रम संपत असताना आपले दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आमदार महोदय गावात आले, यामुळे ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण आले. आपल्या छोटेखानी मनोगतात आमदार शेळके यांनी ग्रामस्थांना मंदिराच्या उर्वरित सभोवतालच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांचे चोख नियोजन
दरम्यान दोन दिवसांच्या सोहळ्यानिमित्त शिळींब ग्रामस्थांनी चोख नियोजन केले होते. मंदिर उभारणीसाठी विशेष मेहनत घेतलेले पंच मंडळी, गावातील वडीलधारे आणि तरूण मंडळ यांनी एकोप्याने काम करून नवा आदर्श घालून दिला. दोन दिवस हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले. सोबत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रामात शिस्तीचे दर्शन घडविले, याचे स्वतः आमदार सुनील शेळके यांनीही कौतुक केले. अखेर बुधवारी कीर्तन सांगता झाल्यानंतर महाप्रसाद आणि रात्री मावळ-मुळशीतील वारकऱ्यांनी केलेला हरीजागर याने दोन दिवसीय सोहळ्याची सांगता झाली.