विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते वेहेरगावचे पोलीस पाटील अनिल पडवळ यांचा सन्मान

लोणावळा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीची यात्रा नुकतीच लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शांततेत पार पडली. आई एकवीरा देवीच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव या गावचे पोलीस पाटील अनिल पडवळ हे यात्रा सुरू होण्याच्या महिनाभर अगोदर पासून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या संपर्कात राहून सर्वतोपरी सहकार्य करत होते. यात्रा काळात देखील ते पूर्ण वेळ मंदिर परिसरामध्ये उपस्थित होते. गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष जबाबदारी त्यांनी पार पडल्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते. संपूर्ण मावळ तालुक्यातून एकमेव पोलीस पाटील अनिल पडवळ यांना गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.