चर्चा तर होणारच ! भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल होणार तरी कधी? रेल्वे गेटच्या समस्येने नागरिक हैराण
लोणावळा : लोणावळा शहरातील बहुचर्चित व बहुप्रतिक्षित भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल होणार तरी केव्हा असा प्रश्न हजारो लोणावळकर नागरिक दररोज उपस्थित करत आहे. त्याचे कारण म्हणजे भांगरवाडी रेल्वे गेटच्या समस्या. मागील काही काळापासून भांगरवाडी रेल्वे गेट नागरिकांसाठी असून खोळंबा झाला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा अगदी रात्री जरी गेले तरी हा रेल्वे गेट कायम बंद असतो. रेल्वे गेट एकदा बंद झाला की किमान 20 ते 35 मिनिटे तो उघडत नाही. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांना या रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागतो आहे. वारंवार सूचना करून व मागणी करून देखील रेल्वे गेट तत्काळ उघडला जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
कोव्हिड पूर्वी हा रेल्वे गेट रेल्वे गाडी पास झाल्यानंतर काही क्षणासाठी उघडला जायचा, तेवढ्या वेळात गेटच्या दुतर्फा असलेली वाहने लगेच निघून जात असत. आता मात्र तीन ते चार गाड्या पास झाल्याशिवाय गेट उघडत नाही. त्यामध्ये किमान एक ते दोन मालगाड्या असतात. त्यामुळे एकदा गेट बंद झाला की तो थेट अर्धा तासाने उघडतो. या रेल्वे गेटच्या समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यान रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय 2005 साली घेतला होता. तब्बल 20 वर्ष होऊन गेली तर हे काम आजुन सुरूच आहे. कोव्हिड सुरू होण्यापूर्वी अतिशय वेगाने ही काम सुरू झाले व नंतर तांत्रिक अडचणींमध्ये येऊन अडकले.
रेल्वे लाईनच्या दुतर्फा असलेल्या जागाच नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याने काम होणार कसे, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर भांगरवाडी बाजूकडील जागेची अडचण सुटल्याने कामाला सुरुवात झाली आहे मात्र नांगरगाव बाजूची अडचण अजूनही कायम आहे. ती जागा ताब्यात घेतल्याशिवाय काम पुढे सरकणार नाही, त्यातच एक इमारत देखील रेल्वे पुलाला खेटून नव्याने उभी राहिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथे पुन्हा अडथळा येऊ शकतो, तो प्रश्न देखील हाताळणे आता क्रमप्राप्त असणार आहे, सार्वजनिक उड्डाणपूल होत असताना त्याला खेटून बांधकामाची परवानगी सदर जागा मालकाला कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली, कशाच्या आधारे दिली, याची देखील चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू असे सांगितले होते. मात्र वस्तुस्थिती पाहता ते अशक्य वाटत आहे. कारण येथील महत्वाचा जागेचा व पुलशेजारच्या नवीन इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. लोणावळा नगरपरिषदेने यावर तातडीने निर्णय घेत हा रेल्वे उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतूकसाठी खुला करावा व नागरिकांना भांगरवाडी रेल्वे गेटच्या जीवघेण्या त्रासातून मुक्ती द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.





















