Breaking news

पुणे रेल्वे स्थानकावर ‘इंद्रायणी एक्सप्रेस’चा ३८वा वाढदिवस उत्साहात साजरा; सत्यनारायण पूजेचेही आयोजन

पुणे : पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारी प्रवाशांची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची रेल्वे गाडी 'इंद्रायणी एक्सप्रेस' हिचा ३८वा वाढदिवस काल, २७ एप्रिल २०२६ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक वर्षांपासून या गाडीने प्रवास करणाऱ्या नियमित पासधारकांनी हा दिवस एका उत्सवाप्रमाणे साजरा केला.

      या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मासिक पासधारकांच्या डब्यामध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. फुलांनी आणि तोरणांनी सजवलेल्या या डब्यात भक्तीमय वातावरणात पूजा संपन्न झाली. रेल्वे प्रवासातील सुरक्षितता आणि प्रवाशांचे आरोग्य सुखकारक राहावे, या भावनेने ही पूजा करण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.

या सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर आणि रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने समीर मारू, भाईजान मुलाणी, महेश आंबर्ले, रोहित साळवी, मयंक शहा, वासुदेव दाराडे, कुणाल कांबळे, मंगेश ओहाळ, सुजित दळवी, सुधीर झोपे, किशोर नांगवेकर, अजित बनसोडे, मुन्ना तांबोळी, मन्सूर तांबोळी, चिराग पाठक, सुप्रिया शेलार, राजेंद्र ओहाळ, आनंद कट्टी, विशाल मोरे, सुमित खैरनार, महेश साळुंखे, अश्विनी जाधव, महेश खरात आणि नीलमाधव प्रधान यांसह इतर सर्व पासधारक उपस्थित होते.

     केवळ पूजाच नव्हे, तर प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी डब्याची सजावट करण्यात आली होती. उपस्थित सर्व पासधारकांच्या वतीने इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांचा पुढील प्रवास सुखकारक, मंगलमय आणि सुरक्षित व्हावा, यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या ३८ वर्षांपासून पुणे-मुंबई प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या या गाडीबद्दल प्रवाशांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. प्रवाशांमधील हे जिव्हाळ्याचे नाते आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झालेला हा वाढदिवस रेल्वे स्थानकावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.

इतर बातम्या