ISRO–URSC क्वालिफिकेशन राउंड 2026: 'ASCEND' प्रोजेक्टसाठी Team IIC_SIT पात्र; सिंहगड इन्स्टिट्यूटसाठी अभिमानाचा क्षण
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील Team IIC_SIT ने ISRO–URSC क्वालिफिकेशन राउंड (Qualification Round) 2026 मधील 'ASCEND' या आव्हानासाठी पात्र ठरत एक मोठे संशोधनात्मक यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (STES) साठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.
ISRO–URSC (U R Rao Satellite Centre) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) एक प्रमुख संशोधन केंद्र असून उपग्रह डिझाइन, विकास आणि प्रगत अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करते. या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा व आव्हाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अंतराळ तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि सिस्टिम डिझाइनमध्ये काम करण्याची संधी देतात. देशभरातील निवडक संघांनाच या स्पर्धेत पुढील टप्प्यासाठी पात्रता मिळते, त्यामुळे Team IIC_SIT चे हे यश अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते.
Team IIC_SIT ने 'ASCEND' प्रोजेक्टसाठी आपल्या समर्पण, कठोर परिश्रम आणि निर्धारपूर्ण दृष्टिकोनाच्या जोरावर ही यशस्वी झेप घेतली आहे. संशोधन क्षेत्रात मिळवलेले हे महत्त्वाचे यश संस्थेतील नवोपक्रम आणि तांत्रिक गुणवत्तेचे द्योतक आहे.
या यशामागे Team IIC_SIT ची सुसंघटित टीमवर्क आणि तांत्रिक कौशल्य महत्त्वाचे ठरले. या संघात यश कांबळे (मिशन डायरेक्टर), हर्ष पंधे, अनिकेत राज, आर्यन राज, अनंत हेजीब, विग्नार्थ चिटिकेन, संस्कार हेराळे, राधिका बडे, शांतनू डुबेवार, सौरभ कदम आणि मानस काळे यांचा समावेश आहे. यापुढील वाटचालीबद्दल बोलताना 'ASCEND' चे मिशन डायरेक्टर यश कांबळे म्हणाले, "आम्ही आता पुढील फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. स्पर्धेतील पुढचे आव्हान अधिक कठीण होत चालले आहे, परंतु आम्ही त्यावर सातत्याने तोडगा काढत आहोत आणि योग्य मार्ग शोधत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेतून आम्ही खूप काही नवीन शिकत असून, या आव्हानात्मक प्रवासाचा मनसोक्त आनंदही घेत आहोत. या स्पर्धेत अत्यंत उज्ज्वल यश मिळवण्याचे आमचे ध्येय आहे."
या संपूर्ण प्रकल्पासाठी डॉ. एम. एस. चौधरी (डीन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग) यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या संशोधनाभिमुख दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार आणि तांत्रिक अंमलबजावणीसाठी योग्य दिशा मिळाली.
तसेच, उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञानाची जोड देण्यासाठी सूरज सुरवे (लीड टेक्निकल इंजिनिअर, ब्लॅकहोल इन्फिव्हर्स LLP) यांनी इंडस्ट्री पार्टनर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष उद्योगमानकांचा प्रभावी वापर शक्य झाला.
यासाठी एसटीईएसचे मुख्य प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल लोणावळा सिंहगड इन्स्टिट्यूट संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, डॉ. एस. डी. बाबर (प्राचार्य, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा), डॉ. डी. एस. मंत्री (उपप्राचार्य), तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी टीमचे अभिनंदन केले.
संस्थेने या यशाबद्दल टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे नमूद केले आहे. Team IIC_SIT च्या या यशस्वी वाटचालीबद्दल STES परिवाराकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.






















