पुणे-लोणावळा ईएमयू लोकल सेवेचा ४८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा; प्रवाशांकडून लोकलची संख्या वाढवण्याची मागणी
लोणावळा : भारतीय रेल्वेच्या पुणे विभागातील प्रवाशांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या पुणे-लोणावळा उपनगरीय ईएमयू (EMU) रेल्वे सेवेने ११ मार्च २०२६ रोजी आपल्या यशस्वी प्रवासाचा ४८ वा टप्पा गाठला. या ऐतिहासिक दिनानिमित्त पुणे रेल्वे विभागातर्फे वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सिनिअर डि ई ई दिपक भाटी, डेपो इनचार्ज बी. दामोदर, रजत सोनावले, पानीग्रही, विशाल माने, सागर भिल आणि बाळासाहेब टोने यांच्यासह रेल्वेचे कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकल सेवेच्या गेल्या साडेचार दशकांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
ऐतिहासिक प्रवास: १९७८ ते २०२६
पुणे विभागातील ईएमयू सेवेचा प्रारंभ ११ मार्च १९७८ रोजी झाला. पुणे ते लोणावळा दरम्यान धावलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट गाडीमुळे या भागात खऱ्या अर्थाने वेगवान वाहतुकीच्या युगाला सुरुवात झाली.
डब्यांची वाढ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, २३ मार्च २००९ रोजी पहिली १२-डब्यांची ईएमयू सेवा सुरू झाली.
तांत्रिक सुधारणा : २००९ मध्येच एसी-डीसी (AC-DC) तंत्रज्ञान आणि १० डिसेंबर २००९ रोजी पूर्णतः एसी ट्रॅक्शन लाईन कार्यान्वित करण्यात आली.
आधुनिक सीमेन्स रेक्स : ११ नोव्हेंबर २०१७ रोजी आधुनिक 'सीमेन्स' रेक दाखल झाले, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित झाला.
टर्मिनसची निर्मिती : ६ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवाजीनगर ईएमयू टर्मिनस कार्यान्वित झाल्याने गाड्यांच्या संचालनाला मोठी गती मिळाली.
प्रवासी संघटनांच्या प्रमुख मागण्या
वर्धापनदिनाचा आनंद साजरा होत असतानाच, रेल्वे प्रवासी संघटनांनी काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत.
"पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होऊन अनेक वर्षे झाली, तरीही लोकलच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. मुंबई उपनगरात कल्याण-बदलापूर दरम्यान ज्याप्रमाणे दर १०-१५ मिनिटांनी लोकल धावते, त्याच धर्तीवर पुणे विभागातही लोकलची संख्या वाढवणे आवश्यक आहे." — मयुरेश जव्हेरी (रेल्वे प्रवासी)
"पुणे-लोणावळा चौपदरीकरणासाठी राज्य सरकारने आपला आर्थिक वाटा देऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने तातडीने या कामाला सुरुवात करावी. वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे." — ईक्बाल (भाईजान) मुलाणी (माजी अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड)





















