डिजिटल क्रांतीचा ऐतिहासिक वारशाशी अनोखा संगम: विसापूर किल्ल्यावर 'ऑडिओ गाईड' सुविधेचा दिमाखदार शुभारंभ!
लोणावळा : जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), मुंबई मंडळ यांच्या वतीने ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर अत्याधुनिक ‘ऑडिओ गाईड’ सुविधेचा दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. किल्ल्यांचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक समृद्धी पर्यटकांपर्यंत सोप्या व रंजक पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने हा क्रांतिकारक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘स्कॅन करा, ऐका आणि आपल्या ऐतिहासिक वारशाचा अनुभव घ्या!’ अशा आधुनिक डिजिटल संकल्पनेवर आधारित ही सुविधा सुरू झाल्याने आता पर्यटकांचा किल्ला भ्रमंतीचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे.
मराठी, हिंदी अन् इंग्रजीत इतिहास जीवंत!
कार्यक्रमादरम्यान माहिती देताना वरिष्ठ संवर्धन सहाय्यक श्री. गजानन मंडावरे म्हणाले, "जागतिक वारसा सप्ताहानिमित्त ASI मुंबई मंडळाच्या वतीने विविध प्रमुख स्मारकांवर ऑडिओ गाईड सुविधा कार्यान्वित केली जात आहे. यामुळे पर्यटकांची स्मारक भेट अधिक माहितीपूर्ण आणि आकर्षक ठरेल. विशेष म्हणजे, ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातून व परदेशातून येणाऱ्या विविध भाषिक पर्यटकांना विसापूर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूवैशिष्ट्ये आणि घडामोडी सहज समजून घेणे शक्य होईल."
अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
हा महत्त्वपूर्ण उपक्रम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ श्री. अभिजित एस. आंबेकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून व प्रेरणेतून साकार झाला आहे. ऐतिहासिक वास्तूंचे केवळ जतन-संवर्धन न करता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या धोरणामुळे या अभिनव उपक्रमाला मोठी गती मिळाली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व शिवप्रेमींची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्यास गड संवर्धन समितीचे सदस्य, लोहगड गावाचे सरपंच श्री. सोमनाथ बैकर, श्री. महेंद्र बैकर, जिल्हा परिषद सदस्य श्री. गणेश धनिवले, ग्रामपंचायत सदस्य श्री. अभिषेक बैकर, तसेच लोहगड-घेरावाडी गावातील श्री. तुकाराम बैकर व श्री. बाळू भोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, श्री. अजय धनिवले, श्री. सचिन बोरडे पाटील, लोहगड–विसापूर विकास मंचाचे श्री. सचिन टेकवडे व त्यांची संपूर्ण टीम, गड संवर्धनासाठी कार्यरत स्वयंसेवक, अभ्यासक आणि असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहगड-विसापूर विकास मंचाकडून ASI चे कौतुक
लोहगड–विसापूर विकास मंचाच्या वतीने श्री. सचिन टेकवडे यांनी ASI मुंबई मंडळाच्या या पुढाकाराचे मनापासून स्वागत केले. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना व दुर्गप्रेमींना प्रामाणिक आणि शास्त्रोक्त ऐतिहासिक माहिती त्यांच्या स्वतःच्या भाषेत थेट उपलब्ध झाल्यामुळे पर्यटन अधिक ज्ञानवर्धक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे श्री. निकांत कुमार, श्री. सागर धनकुडे, श्री. विनोद कुमार आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमातील उत्कृष्ट समन्वयाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. स्थानिक ग्रामस्थ, गड संवर्धन समित्या, लोहगड–विसापूर विकास मंच आणि शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग हा ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी ‘लोकसहभाग’ किती महत्त्वाचा आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण ठरला. विसापूर किल्ल्यावरील ही ऑडिओ गाईड सुविधा डिजिटल तंत्रज्ञान आणि ऐतिहासिक वारशाची सुरेख सांगड घालणारी ठरली आहे.



















