कामशेत येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा; कामशेत पोलिसांच्या तपासाला यश
कामशेत : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कामशेत पोलिसांनी केलेल्या तपासाला यश आले असून, वडगाव मावळ येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी योगेश प्रकाश सोमवंशी (वय ४८, रा. धानोरी, पुणे) याला दोषी ठरवून विविध कलमांनुसार कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन तपासी अधिकारी तथा सध्या कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असलेले सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या तपासकार्याला या निकालामुळे यशाची पावती मिळाली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संतोष परदेशी आणि लालचंद ओसवाल यांनी काम पाहिले.
कामशेत पोलीस स्टेशनमध्ये २०२३ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३५४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ८ व १२ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासी अधिकारी आकाश पवार यांनी केला.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रकरण न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यासाठी तपास यंत्रणेने प्रयत्न केले. या कामात पोलीस हवालदार आशिष झगडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. तसेच पोलीस हवालदार संदीप शिंदे आणि पोलीस शिपाई सौरभ गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. गुन्ह्याच्या तपासापासून ते न्यायालयीन निकालापर्यंत आवश्यक समन्वय राखणे, पुराव्यांचा पाठपुरावा करणे आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य करणे, या बाबी या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरल्या.
आरोपीला विविध कलमांनुसार शिक्षा
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संतोष परदेशी आणि लालचंद ओसवाल यांनी काम पाहिले.
न्यायालयाने आरोपीला POCSO कायदा कलम ८ अन्वये चार वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद व अन्य कलमान्वये शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी वडगाव मावळ सत्र न्यायालयाचे पैरवी अंमलदार GPSI वाघमारे आणि जिल्हा न्यायालयाच्या पैरवी अधिकारी माधुरी तावरे यांनीही समन्वय साधला.
















