Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २६ वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी पवनानगरमधून जेरबंद

लोणावळा : खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २६ वर्षांपासून फरार असणाऱ्या एका मोस्ट वाँटेड आरोपीच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी नाव बदलून पवनानगर भागात लपून राहिला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली आहे.

काय आहे नेमकी घटना?

दिनांक ३० जुलै २००० रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास मौजे सोळबंद आंबेठाण (ता. खेड, जि. पुणे) येथे आरोपी निवृत्ती दौलत जाधव (वय ३१ वर्षे, रा. सोळबंद आंबेठाण) याने आपल्या राहत्या घरी मामी (सासू) लक्ष्मीबाई वाघमारे यांच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर आरोपी निवृत्ती जाधव हा गेल्या २६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.

विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांची चक्रे वेगाने

राज्यात फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधार्थ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक भूषण माने आणि महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती विजया म्हेत्रे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन तो लवकरात लवकर जेरबंद करण्याबाबत पोलिसांच्या पथकाला विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते.

तांत्रिक विश्लेषण अन् शिताफीने कारवाई

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निवृत्ती दौलत जाधव हा आंबेगाव (पो. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) येथे राहत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोसई नाथा केकाण, पोलीस हवालदार प्रशांत तुरे आणि पोलीस नाईक/शिपाई मनोज मोरे यांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.

आरोपी हा स्वतःचे अस्तित्व, नाव व पत्ता बदलून अत्यंत चलाखीने वाजत गाजत राहत होता. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अथक परिश्रम घेऊन सापळा रचत त्यास शिताफिने ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उप-अधीक्षक भूषण माने आणि सहा. पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलीस हवालदार जय पवार, प्रशांत तुरे, प्रणयकुमार उकिर्डे, पोलीस शिपाई मनोज मोरे आणि होमगार्ड भीमराव वाळुंज यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्ण केल्यानंतर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इतर बातम्या