Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात दोन व्यक्तींचा एकमेकांवर चाकू हल्ला; हल्ल्याची घटना कॅमेरात कैद

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मुख्य चौक व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दोन जणांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडलेली आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत एका बंद दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये काही फुगेवाले नागरिक व इतर नागरिक झोपले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या झोपलेल्या व्यक्तीवर अचानकपणे हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर झोपेतून उठलेल्या त्या व्यक्तीने देखील हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर प्रतिहल्ला केला. या दोन्ही व्यक्तींच्या हातामध्ये चाकू सारख्या धारदार वस्तू होत्या व त्याने ते एकमेकांना मारत होते. दोघांचेही हल्ल्यानंतर त्या ठिकाणी रक्तस्त्राव झाला त्यामुळे आजूबाजूला झोपलेल्या इतर नागरिकांनी त्यांना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे.

दिवसभर लोणावळा शहरातील गर्दीच्या ठिकाणी हे नागरिक मुलांच्या व महिलांच्या हस्ते वेगवेगळ्या रंगाचे फुगे विक्री करतात व त्यामधून मिळालेल्या पैशातून नशा करतात या नशेबाजीतून अनेक वेळा यांच्यामध्ये भांडण तंटे झाल्याच्या घटना यापूर्वी देखील घडले आहेत. रात्री घडलेला प्रकार हा कोणी तक्रार न दिल्यामुळे पोलीस ठाण्यात नोंद झाला नसला तरी एका कॅमेरा मध्ये तो कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. रात्रीच्या वेळी देखील पर्यटकांची वर्दळ शहरामध्ये सुरू असते. तसेच पहाटे देखील अनेक पर्यटक शहरामध्ये दाखल होत असतात. नशा करून रात्री अपरात्री वेगवेगळ्या भागांमध्ये फिरणाऱ्या या नागरिकांकडून पर्यटक असो वा स्थानिक नागरिक यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. मागील काळामध्ये नगरपरिषद व तत्कालीन लोकप्रतिनिधी तसेच पोलीस अधिकारी यांनी या फुगे विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांना लोणावळा शहरातून हद्दपार केले होते. मात्र काही दिवस शहराबाहेर गेल्यानंतर पुन्हा यांचा तांडा एक एक करत लोणावळा शहरांमध्ये दाखल झाला आहे.

पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके फुगे विक्रेते शहरांमध्ये होते. आज ही संख्या शंभराच्या आसपास गेली आहे. शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी व्यवसाय करून पोट पाणी भरणे हे योग्य असले तरी त्यांच्याकडून नागरिकांना होत असणारा त्रास व आजच्या किरकोळ घटनेतून उद्याची गंभीर घटना घडू नये याकरिता लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस या दोन्ही प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत त्यांच्यावर अंकुश ठेवणे अथवा त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवून देणे याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या