नांगरगावात पूर परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या नाल्यावरील त्या अतिक्रमणावर कारवाई; नगरसेवक सुभाष डेनकर यांच्या भूमिकेचे कौतुक
लोणावळा : नांगरगावात आजपर्यंत केव्हाही न झालेली पूर परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती. या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या आल्यावर त्या अतिक्रमणावर आज अखेर लोणावळा नगर परिषदेने कारवाई केली आहे. नांगरगाव प्रभागाचे नगरसेवक सुभाष डेनकर यांनी नागरिकांच्या सुरक्षतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशा शब्दात सुनवत आज निर्माण झालेली पूर परिस्थिती ही शेवटची असेल असे म्हणत या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करा अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर प्रशासनाने नाल्यावर बांधलेले अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली आहे.
पाच जुलैपासून लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सहा जुलै ची सकाळ उजाडली ती पूर्व परिस्थितीने. नांगरगाव भागातील आदर्श कॉलनी, जाधव कॉलनी, नक्षत्र सोसायटी, सुरय्या सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, बलकवडे घराचा परिसर या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शोधल्यामुळे साहित्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नांगरगाव ते भांगरवाडी हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला होता. रस्त्यावर चार ते पाच फुटापर्यंत पाणी साचले रस्त्याच्या कडेला असलेल्या एमएसईबी च्या डीपी पाण्याखाली गेल्या यामुळे या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.
भांगरवाडी भागातून सर्व पाणी वाहून घेऊन येणारा एक मोठा नाला जो साधारण अडीच मीटर अंतराचा आहे तो आदर्श कॉलनीपासून पुढे जाताना अवघ्या अडीच फुटाचा झाला आहे. या नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे नांगरगाव भागामध्ये ही पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता हे काम होत असतानाच त्या भागातील नागरिकांनी या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र ते न झाल्यामुळे व नगरपरिषद प्रशासनाने देखील याकडे लक्ष न दिल्यामुळे कधी नवे ती पूर्व परिस्थिती नांगरगाव भागामध्ये निर्माण झाली होती. गेले चार दिवस सुभाष डेनकर व त्यांचे संपूर्ण कुटुंब या भागातील नागरिकांना मदत करत होते. ते ज्या भागात राहतात ती डेनकर कॉलनी देखील पूर्णपणे पाण्याखाली होती. त्या नागरिकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यासोबत नांगर गावातील सोसायट्यांमध्ये ते स्वतः पाण्यामध्ये उतरून काम करत होते.
नांगरगावातील पूर परिस्थिती ओसरल्यानंतर डेनकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ती म्हणजे पुन्हा या भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको असेल तर नाल्यावर झालेली अतिक्रमणे ताबडतोब काढावीत, ती कोणाची असो नागरिकांच्या सुरक्षेतेच्या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर गुरुवारी सकाळीच ब्रेकर मशीन लावत नाल्यावरील ते आरसीसी बांधकाम तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आजपर्यंत जे कोणी केले नाही ते सुभाष डेनकर यांच्या पुढाकारातून होत असल्यामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. लोणावळा शहरातील पूरपरिस्थिती ही जशी नैसर्गिक आहे तसेच काही प्रमाणात ती मानवनिर्मित देखील आहे. ज्या ज्या ठिकाणी नदी नाल्यांवर अतिक्रमण हे झाली आहेत किंवा होत आहेत त्या सर्व ठिकाणी नगरपरिषद प्रशासनाने कठोर कारवाई करत ही सर्व अतिक्रमणे काढत पाण्याचे प्रवाह मोकळे करावेत अशी मागणी लोणावळ्यातील तमाम नागरिक करत आहेत.
कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालू नका !
लोणावळा शहरातील पूरपरिस्थिती ही केवळ निसर्गनिर्मित नसून ती मानवनिर्मित देखील आहे. पाण्याचे प्रवाह ज्या ज्या ठिकाणी अडवण्यात आले आहेत अथवा कमी करण्यात आले आहेत त्या त्या ठिकाणी नगर परिषदेने व लोकप्रतिनिधींनी एकत्रित रित्या कारवाई करत नदी नाले पाणी वाहून जाण्यासाठी मोकळे करावेत. ही कारवाई करत असताना कोणालाही पाठीशी घालू नका ज्याने कोणी अतिक्रमण हे करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी कोणतेही तडजोड करू नये अशी स्पष्ट शब्दात मागणी नागरिकांनी केली आहे.






















