लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत 250 हून अधिक कुटुंबाचे मोठे नुकसान; 503 जणांना सुरक्षित स्थळी हलवले
लोणावळा : नैसर्गिक आपत्तीमुळे लोणावळा शहरांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणच्या 250 हून अधिक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 503 नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहे. 29 जून पासून लोणावळा शहरामध्ये सुरू झालेल्या संततधार पावसाचे 5 जुलै पासून मुसळधार पावसात रूपांतर झाले. अवघ्या दहा दिवसांमध्ये लोणावळा शहरामध्ये 2226 मिमी (87.63 इंच) एवढा पाऊस झाला आहे. त्यापैकी 1398 मिमी (55 इंच) एवढा पाऊस अवघ्या तीन दिवसात झाला आहे.
आभाळ फाटल्याप्रमाणे लोणावळा शहरामध्ये 5, 6 व 7 जुलै रोजी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराला पुराचा विळखा बसला. शहरावर निर्माण झालेल्या या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते कसोशीने काम करत आहेत. ज्या ज्या भागांमध्ये पाणी पातळी वाढली त्या त्या भागामध्ये रेस्क्यू करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. लोणावळा शहर हे उंचावर असल्यामुळे शहरांमध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील अनेक भागातील पाणी हे उताराच्या दिशेने वाहून गेले. इंद्रायणी नदीपात्राच्या लगत असलेली घरे मात्र या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात बाधित झाली आहेत. जवळपास 250 हून अधिक कुटुंबाचे यामध्ये मोठे नुकसान झाले. सुदैवाची बाब म्हणजे या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. लोणावळा धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे धरणाचे पाणी ओर फ्लो च्या खिडक्यांमधून शहरांमध्ये आले. हे पाणी लोणावळा शहरांमध्ये येऊ नये याकरिता लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली करत तसेच मंत्रालयामध्ये संपर्क साधत ते पाणी डक्ट लाईनच्या माध्यमातून घाट क्षेत्रामध्ये सोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे तिसऱ्या दिवशी लोणावळा शहरातील पूरपरिस्थिती हळूहळू ओसरु लागली आहे.
सात जुलै च्या रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे मध्यरात्रीनंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. सुदैवाने धरणाचे पाणी डक्ट लाईन मार्गे सुरु झाल्यामुळे लोणावळा शहरावर आलेले हे दुसरे संकट टळले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस सुरूच असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे अद्यापही हुडको कॉलनी व नांगरगाव भागातील काही सोसायटीमध्ये पाणी कायम आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे पाणी कमी होणार आहे. तूर्तास नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद इमारतीच्या तळमजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला असून संपर्क नंबर देखील प्रसिद्ध केली आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्यापर्यंत कोणतीही माहिती आली तर ती अधिकृत यंत्रणेकडून पूर्व तपासणी करून घ्यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.






















