Breaking news

लोणावळा टपरी, पथारी व हातगाडी पंचायत संघटनेची बैठक उत्साहात; नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

लोणावळा : लोणावळा शहरातील टपरी, पथारी व हातगाडीधारकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्व टपरी, पथारी व हातगाडी पंचायत लोणावळा शहर संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मॅकडोनाल्ड मॉल येथील सभागृहात उत्साहात पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सूचनेनुसार, संघटनेचे मार्गदर्शक वसंतराव काळोखे आणि लोणावळा शहराध्यक्ष गणेश गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत लोणावळ्यातील सर्व टपरीधारकांनी कोणत्याही प्रकारे भयभीत होऊ नये. संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. आमदार सुनील अण्णा शेळके, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांच्याशी संघटनेचे पदाधिकारी चर्चा करून टपरीधारकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, ज्या टपरीधारकांचे शेड, जाहिरात फलक किंवा इतर साहित्य वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण करत असेल, त्यांनी स्वतःहून संबंधित साहित्य काढून घ्यावे, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी संघटनेविरोधी कामकाज केल्याच्या कारणावरून रमेश म्हाळस्कर यांची सर्वानुमते ठराव करून संघटनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे त्यांचा संघटनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या सूचनेनुसार तसेच मार्गदर्शक वसंतराव काळोखे आणि शहराध्यक्ष गणेश गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

यामध्ये मावळ तालुका अध्यक्षपदी भारत चिकणे, उपतालुकाध्यक्षपदी बाबा ओव्हाळ व जमीलभाई सय्यद, शहर सचिवपदी संदीप पोटफोडे, खजिनदारपदी आकाश परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी आनंद पुजारी, अशोक अण्णा कदम, रवींद्र चव्हाण व ताजुद्दीन शेख यांची, तर सहसचिवपदी मनीष आंदेकर आणि सहखजिनदारपदी लक्ष्मण दाभाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. महिला विभागाच्या अध्यक्षपदी हिराबाई दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच खंडाळा विभाग अध्यक्षपदी मुस्कान शेख, बाजार विभाग अध्यक्षपदी अविषा जाधव, गवळीवाडा विभाग अध्यक्षपदी स्वाती लोखंडे आणि गोल्ड व्हॅली विभाग अध्यक्षपदी अलका काळे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या प्रसिद्धीप्रमुखपदी शकील बागवान, तर कायदेशीर सल्लागारपदी ॲड. चेतन औरंगे यांची नियुक्ती करण्यात आली.

टपरीधारकांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार

या बैठकीस लोणावळा नगरपरिषद पथविक्रेता समितीचे सदस्य व संघटनेचे मार्गदर्शक वसंतराव काळोखे, सुनील कुचेकर, निर्मला पांगारे, महादेव जगताप, नरेश खोंडगे, गणेश काळडोके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने टपरी, पथारी व हातगाडीधारक उपस्थित होते. टपरीधारकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघटना एकजुटीने आणि ताकदीने लढा देईल. टपरीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व नगरपरिषद प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार बैठकीच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.

इतर बातम्या