Sports News l आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सिंहगडच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
लोणावळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा विभागांतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन लोणावळा येथील डॉ. बी. एन. पुरंदरे कला महाविद्यालय, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य महाविद्यालय आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत सिंहगड संकुलातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत एन बी एन सी ओ सी एस (NBNCOCS) महाविद्यालयाची विद्यार्थिनी यशश्री शेलार हिने ६३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील विद्यार्थी आदित्य बालकवडे याने पुरुषांच्या ९३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर झोनल स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. यासाठी संस्थेचे निकेत गावकर, शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडा विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देऊन उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यामध्ये त्यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल एन बी एन सी ओ सी एस (NBNCOCS) चे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशश्री शेलार आणि आदित्य बालकवडे यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि क्रीडा कौशल्याचे कौतुक करून आगामी झोनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सिंहगड संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.



















