लोहगड थरार: 'बिग फॅट वेडिंग' ठरले 'मर्डर प्लॅन'; भावी पत्नीनेच मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकलले!
लोणावळा : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवाल या २५ वर्षीय तरुणाचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव अखेर पोलिसांनी उधळून लावला आहे. केतनचा मृत्यू अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला खूनाचा थरारक कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा केला होता बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत केतन विशाल अगरवाल (वय २५, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) याचे सिया प्रविण बसेसवर गोयल (रा. मार्केट यार्ड, पुणे) हिच्यासोबत लग्न ठरले होते. 19 फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुढा झाला होता. १८ जून २०२६ रोजी हे दोघे लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपामध्ये केतनचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी, किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरला आणि तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती सिया गोयल हिने दिली होती. त्यानुसार सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (रजिस्टर नं. ३६/२०२६ बी.एन.एस.एस. १९४) नोंद करण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संशयावरून सखोल तपास
घटना प्रथमदर्शनी संशयास्पद वाटल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश देत दोन विशेष पथके तैनात केली. प्रॉपर्टीचा वाद किंवा प्रेमसंबंध या बाजूने पोलिसांनी तपास सुरू केला असता, मुलीचे म्हणजेच सियाचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६) यांनीही सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने संगणमत करून केतनला किल्ल्यावरून ढकलून मारल्याची फिर्याद दिली. त्यावरून २३ जून २०२६ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असा रचला खूनाचा कट…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून शोध घेत प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, सियाचे लग्न केतन अगरवालसोबत ठरले होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते आणि केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. यामुळे दोघांनी केतनचा काटा काढण्याचा कट रचला. योजनेनुसार, सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि प्रियकर चेतन चौधरी यालाही पाठीमागून तिथे बोलावून घेतले. संधी साधून दोघांनी केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले आणि त्याचा खून केला.
एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 3 वेळा केतनला लोहगडावर नेहले
सिया अग्रवाल हिने एक दोन वेळा नव्हे तर 20 दिवसात तब्बल तीन वेळा केतन अग्रवाल याला लोहगडावर नेहले होते अशी माहिती केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिली. त्याला मारण्याचा कट हा पूर्वनियोजित होता. लग्नची मागणी त्यांनीच घातली होती व सियाला लग्न करायचे नव्हते तर तसे सांगायचे होते, आम्ही लग्न रद्द केले असते. आज आमचा एकुलता एक मुलगा गेला, आम्ही काय करायचे, आम्हाला न्याय मिळावा व केतन ची हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी मयत केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी केली आहे. तसेच लग्नासाठी महाल बुक केला, विमाने बुक केली हे सर्व काल्पनिक व खोटं आहे असे विजय अग्रवाल यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते मात्र लग्नाचे ठिकाण अद्याप ठरलेले नव्हते असे ते म्हणाले.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या क्रूर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी प्रियकर चेतन चौधरी याच्यासह होणारी पत्नी सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लीलाकुंज, न्यू एरा सोसायटी समोर, बिबवेवाडी, पुणे) हिला देखील ताब्यात घेतले आहे. ते दोघेही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात एकत्र होते. तेथे त्यांची मैत्री झाली होती. दोघांच्या कुटुंबाचे मार्केटयार्ड मध्ये दुकाने आहेत. त्यांना वडगाव न्यायालयात हजर केले असता 29 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पो.नि. दिनेश तायडे, पोसई अभिजित सावंत, सपोनि मनोज पवार तसेच पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल कसबेकर, संजय पंडित, प्रशांत तरे, पवन कराड, सचिन गायकवाड, नंदा कदम, सुजाता कदम, शरयू बिरंबळे आणि लोणावळा ग्रामीणच्या पथकातील जय पवार, सागर शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाऊसाहेब पंड, समीर तांगडे व महिला पोलीस अंमलदार सागर धनवे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.



















