पुणे ग्रामीण LCB ची मोठी कारवाई l लोणावळा परिसरात ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक; ७.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक हुंडाई आय-१० कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत कुसगाव येथील आयआरबी कार्यालय परिसरात एका कारमधून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित शुभम शर्मा हा कारमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० (क्र. एमएच १४ बीके ७२३५) कारची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान पोलिसांना ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित शुभम शर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला होता.
लोणावळा व मावळ परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.



















