Breaking news

राजमाची पॉईंटवरील पर्यटकाची चोरी उघड; लोणावळा शहर पोलिसांची धडक कारवाई; आरोपीसह २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

लोणावळा : खंडाळा येथील प्रसिद्ध राजमाची पॉईंट परिसरात नाष्टा करत असलेल्या पर्यटकाचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर मौल्यवान साहित्य चोरणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.    

       तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत सुमारे २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी हरिदास बाळू कोळेकर याला अटक करण्यात आली आहे.

      लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील राजमाची पॉईंटवरील एका स्टॉलवर पर्यटक नाष्टा करत असताना त्याचा एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल कंपनीचे मोबाईल, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स आणि इतर साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात २५ जुलै २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुगल पे व्यवहारांची माहिती आणि स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा बारकाईने अभ्यास केला. तपासादरम्यान संबंधित खातेदाराचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता मिळाल्यानंतर मोबाईल लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपी सध्या कल्याण येथील मानपाडा परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले.

          पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने लोणावळा शहर पोलिसांचे पथक मानपाडा पोलीस ठाणे, कल्याण येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून हरिदास बाळू कोळेकर याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान आरोपीने सदर चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, दोन ॲपल मोबाईल फोन, ॲपल स्मार्ट वॉच, ॲपल एअरपॉड्स, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा शाईन दुचाकी (क्रमांक : MH-03-FG-3349) असा एकूण २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       ही उल्लेखनीय कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार संदीप दगडू मानकर, पोलीस शिपाई नागेश कमठणकर, होमगार्ड अक्षय कोकाटे यांनी केली.

इतर बातम्या