मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहन चालकाला लुटणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनचालकांना लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे औंढे गावाजवळील पुलानजीक 15 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी आपल्या ताब्यातील टेम्पोने पुण्याबाजूकडून मुंबईकडे जात असताना लघुशंकेसाठी एक्सप्रेसवेच्या कडेला वाहन थांबवले. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून पोबारा केला.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 309(4), 352 व 351(2) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हा गुन्हा संदेश अंकुश हिलम (वय 23, रा. विनेगाव, बावदेववाडी, ता. खालापूर, जि. रायगड) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील व्हिवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच 9 हजार 700 रुपये रोख रक्कम असा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपासादरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही उघड झाले असून त्याच्याविरुद्ध खालापूर पोलीस ठाणे, जिल्हा रायगड येथे दरोडा आणि जबरी चोरीचे दोन गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोमपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार संतोष शेळके, अंजर मोमीन, सागर नामदास, गणेश होळकर, सिद्धेश पाटील तसेच पोलीस शिपाई भारत मोहोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
























