मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर गळतीमुळे खळबळ; पोलिसांच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली, वाहतूक सुरळीत
खंडाळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी एका केमिकल टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना घडल्याने काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, महामार्ग पोलीस आणि देवदूत पथकाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून, वेळीच उपाययोजना करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक दामोदर यादव (रा. झारखंड) हा आपल्या ताब्यातील 'लिक्विड कार्बन डाय-ऑक्साइड' गॅसने भरलेला टँकर क्रमांक (MH 06 BW 1909) घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होता. दुपारी साधारण 1.45 वाजताच्या सुमारास हा टँकर एक्सप्रेसवेवरील किलोमीटर 46 जवळ आला असता, टँकरच्या वरील बाजूला असलेल्या 'सेफ्टी वॉल्व्ह'मधून कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले.
तातडीने उपाययोजना आणि मदतकार्य
गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच, प्रसंगावधान राखून टँकरला तात्काळ किलोमीटर 46.100 जवळ रस्त्याच्या कडेला (साईडला) सुरक्षितपणे थांबवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा टॅपचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवींद्र मुदळ, PSI कटपाळे आणि पोलीस अंमलदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सुरक्षेचा उपाय म्हणून, टँकरमध्ये ज्या कंपनीतून गॅस भरण्यात आला होता, तेथील सेफ्टी मॅनेजर सुमन कुमार यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. सेफ्टी मॅनेजर यांनी हा गॅस जास्त धोकादायक नसून घाबरण्याचे कारण नाही असा दिलासा दिला. त्यांच्या तांत्रिक सूचनेनुसार, तज्ज्ञांच्या मदतीने होत असलेली गॅस गळती पूर्णपणे बंद करण्यात आली.
आय.आर.बी. च्या 'देवदूत' आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचून टँकर पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने टँकर ड्रायव्हर दामोदर यादव याला प्रवासादरम्यान योग्य ती सुरक्षितता व काळजी घेण्याच्या कडक सूचना देऊन टँकर पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केला. सदरची संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षिततेचे नियम पाळून करण्यात आली. गॅस गळती थांबवल्यानंतर एक्सप्रेसवेवरील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्णपणे सुरळीत करण्यात आली आहे.






















