लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात लाडक्या गणपती बाप्पा व गौराई देवीला भावपूर्ण निरोप
लोणावळा : मागील सात दिवसांपासून श्रद्धा भावाने पुजलेल्या लाडक्या गणपती बाप्पा व गौराई देवीला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात आज ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर… गणपती चालले गावाला… चैन पडेना आम्हाला… अशी हाक देत भावपूर्ण निरोप देण्यात आला. लोणावळा शहर परिसरातील गणपती विसर्जन हौद पाण्याचे तलाव व ग्रामीण भागातील पाण्याच्या खाणी तसेच इंद्रायणी नदीपात्रामध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
सकाळपासूनच पावसाने समाधानकारक उघडीत घेतली होती. दुपारपासून गणपती बाप्पांची आरती करत लाडक्या गणरायाला विसर्जनासाठी भाविक घाटावर घेऊन जात होते. ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाबाची उधळण करत वाजत गाजत… गणपती बाप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. वळवण गावातील तलावामध्ये वलवन नांगरगाव पांगोळी व आजूबाजूच्या भागामधील गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने या ठिकाणी बोटची व्यवस्था करण्यात आली होती तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी वडापाव व चहाचे मोफत वाटप करण्यात आले उपक्रमाचे हे चौदावे वर्ष होते. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ जांभळे, नगरसेवक निखिल कवीश्वर, नगरसेवक मुकेश परमार, नगरसेवक सुभाष डेहनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी देत उपक्रमाचे स्वागत केले.
बाजारभागातील इंद्रायणी नदीकाठावर लोणावळा नगरपरिषदेने हौद तयार करण्यात आला आहे या ठिकाणी देखील भांगरवाडी व बाजारपेठेतील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. लोणावळा गावठाण खोंडगेवाडी भागातील गणपती बाप्पांचे विसर्जन लोणावळा धरणामध्ये करण्यात आले. तुंगार्ली भागातील गणपती बाप्पांचे विसर्जन हे तुंगारलेश्वर मंदिराजवळ तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदात करण्यात आले. खंडाळा भागातील गणपती बाप्पांची विसर्जन हे तलावामध्ये करण्यात आले. सर्वत्र भक्तांचा उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने सर्व विसर्जन घाटांवर तसेच ज्या ज्या भागातून मोठ्या संख्येने गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघत होते त्या सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता. नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व नगरसेवक हे सर्व घाटांवर जाऊन गणेश भक्तांचे स्वागत करत होते.




















