लोणावळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाईविरोधात पथविक्रेत्यांचा 16 सप्टेंबर रोजी नगरपरिषदेवर धडक मोर्चा
लोणावळा : लोणावळा आणि खंडाळा परिसरातील टपरी, पथारी आणि हातगाडी धारकांवर लोणावळा नगरपरिषदेकडून अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली होत असलेल्या कथित अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी लोणावळा नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता मावळी शेतकरी पुतळा येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून, तो नगरपरिषद कार्यालयावर नेण्यात येणार आहे.
पथविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र व महाराष्ट्र शासनाने पथविक्रेत्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ तसेच पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) कायदा २०१४ लागू केला आहे. तसेच या संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय काढून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, लोणावळा नगरपरिषदेकडून या कायद्यांची व शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी न करता अचानक अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप पथविक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून टपरी, पथारी आणि हातगाडीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आधी हक्कांचे संरक्षण, मग कारवाई अशी पथविक्रेत्यांची भूमिका
पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी करून पथविक्रेत्यांचे पुनर्वसन, विक्री क्षेत्र निश्चिती आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. अतिक्रमणाच्या कारवाईच्या नावाखाली थेट व्यवसाय बंद पाडल्यास अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या कथित मनमानी कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनासमोर पथविक्रेत्यांच्या विविध मागण्या मांडण्यात येणार असून, शासनाच्या संबंधित कायदे व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
लोणावळा व खंडाळा परिसरातील सर्व टपरी, पथारी आणि हातगाडी धारकांनी बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले आहे.




















