ढोल ताशांच्या गजरात लोणावळा शहर व परिसरात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन
लोणावळा : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करत लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी आज लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या जल्लोषात व उत्साहात झाले. पहाटेपासूनच बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू होती. कालपासून वरून राजाने देखील लोणावळा परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. दिवसभर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. मोठया भक्तीभावाने व जल्लोषपूर्ण वातावरणात ढोल ताशांचा गजर करत बाप्पांचे आगमन झाले.
14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनाची तयारी मागील काही दिवसांपासून सर्वत्र सुरू होती. काही दिवसांपासून घरोघरी आरास सुरू होती. काही ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती घरी आणत त्याला डायमंड व इतर ज्वेलरी लावण्याचे काम सुरू होते. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने गणपती उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुसगाव भागामध्ये घरगुती गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारचे लक्षवेधी डेकोरेशन बनविण्याची मागील काही वर्षांची परंपरा या वर्षी देखील कायम आहे.
सकाळच्या सत्रामध्ये घरगुती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दुपारपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू झाल्या होत्या. ढोल ताशांचा गजर व पारंपारिक वाद्य वाजवत मंडळाचे कार्यकर्ते गणपती बाप्पांच्या मूर्ती मंडळाच्या ठिकाणी घेऊन जात होते. गुलाबाची देखील काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात उधळण सुरू होती. बाजारपेठेमध्ये अगदी सकाळपासूनच हार, फुले व डेकोरेशनचे साहित्य, फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोणावळा शहर पोलीस व वॉर्डन वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी सकाळपासूनच चौकाचौकांमध्ये तैनात होते.
अतिशय आनंदी वातावरणामध्ये आज लोणावळा शहर व सर्व परिसरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले. काही ठिकाणी दीड दिवसांचे, काही ठिकाणी पाच दिवस, काही सहा दिवस, सात दिवस नऊ दिवस व दहा दिवस अशा प्रकारचे बाप्पा विराजमान झाले आहेत. लोणावळा शहरात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणारी 51 मंडळे आहेत. त्यापैकी 22 मंडळी ही मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. यंदाचा गणेश उत्सव डिजे मुक्त वातावरणात व पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये धार्मिकता जमत साजरा व्हावा याकरता प्रशासनाच्या वतीने तब्बल तीन वेळा गणेश उत्सव मंडळाच्या बैठका पार पडल्या.
लोणावळा शहरातील गणेशोत्सवाला 100 वर्षाहून आधी काळाची परंपरा आहे. ही परंपरा जपत, कायदा व सुव्यवस्था राखत, सर्वधर्म समभाव जपत सालाबादप्रमाणे या वर्षी देखील गणेश उत्सव जल्लोष व निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाकडून सर्व गणेश उत्सव मंडळांना करण्यात आले आहे.




















