15 ऑगस्ट ला जोडून आलेल्या लॉंग वीकेंडला लोणावळ्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करा; अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवा - नगरसेवक निखिल कवीश्वर यांची लोणावळा शहर पोलिसांकडे मागणी
लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिक देखील मेटाकुटीला आले आहेत. मागील काही आठवड्यांपासून वारंवार लोणावळा शहरामध्ये होत असलेली वाहतूक कोंडी व पोलिसांचे ढिसाळ नियोजन यामुळे लोणावळावासियांना वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे. येत्या 15 ऑगस्ट ला जोडून लॉंग वीकेंड आल्यामुळे या सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लोणावळा शहरांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता लोणावळा शहर पोलिसांनी या लॉंग वीकेंडच्या वाहतुकीचे आतापासूनच योग्य नियोजन करावे. पोलीस मुख्यालयातून याकरता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करावी. केवळ मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग, कुमार चौक, सहारा पूल येथेच लक्ष केंद्रित न करता शहरातील भांगरवाडी, नांगरगाव, वलवन, तुंगार्ली, जुना खंडाळा, खंडाळा या भागात देखील पोलीस कर्मचारी अथवा वॉर्डन नियुक्त करत त्या भागामधील वाहतूक कोंडी सोडवण्यावर लक्ष द्यावे अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी लोणावळा शहर पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निखिल कवीश्वर म्हणाले दरवर्षी लोणावळा शहर पोलीस हे लोणावळा नगरपरिषद व स्थानिक स्वयंसेवक यांच्यासोबत समन्वय साधत वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे नियोजन पावसाळा सुरू होण्यापूर्वी पासून करत असतात. यावर्षी मात्र वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे कोणतेही नियोजन योग्य प्रकारे न झाल्यामुळे अगदी पावसाला सुरुवात झाल्यापासून लोणावळा शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात तर या वाहतूक कोंडीने रेकॉर्ड केला. तासनतास वाहने जागेवर थांबून राहत असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. लोणावळा शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो. स्थानिक लोणावळाकर नागरिकांना तर अक्षरशः घरातून बाहेर पडणे देखील जिकिरीचे बनले आहे. रस्त्यावर काही ठराविक भाग वगळता कुठेही पोलीस अथवा वॉर्डन दिसून येत नाहीत.
भुशी धरणाकडून पुन्हा माघारी येणारी वाहने ही रायवुड येथून जुना खंडाळा मार्गे मुंबईच्या दिशेने व हनुमान टेकडी लगतच्या रस्त्यावरून कुसगाव येथे मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गे बाहेर काढता येऊ शकतात. त्याकरिता दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहेत. लोणावळा शहरामध्ये येण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. मात्र योग्य प्रकारे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालक एकाच रस्त्याने ये जा करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वाहन चालक वाहतूक कोंडी मध्ये वाहने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत वाहतूक कोंडीच्या समस्यामध्ये भर घालत आहेत. अशा वाहन चालकांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. रस्त्यावर पोलीस दिसत नसल्यामुळे वाहन चालक बेशिस्तपणे गाड्या पुढे नेतात. कोठेही कशाही प्रकारे वाहने उभी केली जातात. लोणावळा बाजारपेठेमध्ये पूर्वी वनवे करण्यात आल्या होतात तो देखील बंद करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सीझनमध्ये रस्त्यावर अडथळा ठरणारी वाहने उचलण्यासाठी क्रेन सर्विस होती तसेच जॅमर लावून देखील वाहनांकडून दंड आकारणी केली जात होती यंदा मात्र वाहतूक नियंत्रणासाठी कोणतेही उपाययोजना लोणावळा शहर पोलिसांकडून होताना दिसत नाही असे नगरसेवक निखिल कवीश्वर म्हणाले.
15 ऑगस्ट ला जोडून सलग सुट्ट्या आले आहेत या दिवशी लोणावळा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी राहणार आहे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा विचार करूनच स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी या समस्ये कडे गांभीर्याने लक्ष देत वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. लोणावळा नगरपरिषद देखील पोलिसांना याकरिता सहकार्य करण्यास तयार आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
प्रमुख मागण्या
1) 14, 15 व 16 ऑगस्ट रोजी अवजड वाहनांना लोणावळा शहरात बंदी घालावी. भुशी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या बसेस यांना अंतर्गत रस्त्यावर बंदी घालत सदर वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या पुलाखाली वलवन येथे थांबवावीत. तेथून रिक्षा अथवा स्थानिक वाहनांनी पर्यटकांनी पर्यटन स्थळी जावे.
2) भुशी धरण टायगर पॉईंट या भागातून माघारी येणाऱ्या वाहनांना रायगड येथून जुना खंडाळा मार्गे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बाहेर काढावीत.
3) जुना खंडाळा व भांगरवाडी रेल्वे गेट येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, रेल्वे पोलिसांशी समन्वय साधत अधिकचा बंदोबस्त मागवून घ्यावा.
4) कुणेनामा, डेल्ला फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत.
5) स्थानिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास सोडवण्यासाठी भांगरवाडी, नांगरगाव, वलवन, रायवूड, तुंगार्ली, खंडाळा, जुना खंडाळा येथे पोलीस कर्मचारी नियुक्त करत तेथील वाहतूक कोंडीचे नियोजन करावे.



















