Breaking news

पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीला रोटरीचा ‘सहयोग’; किराणा किट व ब्लँकेटचे वाटप

लोणावळा : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिट यांच्या सहकार्याने भैरवनाथ नगर, लोणावळा येथे ‘प्रकल्प सहयोग’ राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट तसेच ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

     अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अशा संकटाच्या काळात नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. किराणा किट आणि ब्लँकेट मिळाल्याने पूरग्रस्त कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

     ‘अडचणीच्या काळात मदतीचा हात आणि माणुसकीची साथ’ हा संदेश देत रोटरीच्या सदस्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपत संकटकाळात गरजू कुटुंबांना तातडीची मदत पोहोचविण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले.

      या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटचे अध्यक्ष रो. सचिन मोरे आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा रो. श्वेता रावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षा रो. ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार, वरिष्ठ रोटेरियन रो. धीरुभाई, रो. रवींद्र कुलकर्णी, रो. पुंडलिक वानखेडे, रो. दिलीप पवार, रो. दुर्रिया रामपुरवाला, रो. तस्नीम भोरी, रो. नारायण शरवळे, रो. नितीन कल्याण, रो. विजया कल्याण आणि रो. जयवंत नालोडे यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

      रोटरीच्या यावर्षीच्या ‘Create Lasting Impact’ या संकल्पनेनुसार समाजातील गरजू घटकांना तातडीची मदत देण्याबरोबरच त्यांच्या मनात विश्वास, सुरक्षितता आणि आधाराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढे येण्याची गरज असताना रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. “एकत्र येऊया, मदतीचा हात देऊया आणि आपल्या समाजात कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


इतर बातम्या