Breaking news

लोणावळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शिव-समर्थ किर्तनाचे आयोजन; श्रीराम मंदिर भांगरवाडी येथे कार्यक्रम संपन्न

लोणावळा : विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून लोणावळा येथील श्रीराम मंदिर, भांगरावाडी येथे समर्थ भक्त मुग्धा पुंडे यांच्या ‘शिव-समर्थ’ या विषयावरील आख्यानावर आधारित नारदीय किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद लोणावळा प्रखंड आणि बजरंग दल लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

      कार्यक्रमाचा प्रारंभ भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. याप्रसंगी बोलताना विहिप मावळ-मुळशी जिल्हा मंत्री महेंद्र असवले यांनी संघटनेच्या ६२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. विश्व हिंदू परिषद प्रतिवर्षी स्थापना दिनानिमित्त हिंदू समाजाचे एकत्रीकरण आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी विविध उपक्रम राबवते. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना हद्दपार करून समाजात एकोपा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 'धर्मो रक्षति रक्षित:' या बोधवाक्याप्रमाणे आणि 'अक्षय वटवृक्ष' या बोधचिन्हाप्रमाणे संघटनेचे विचार आणि कार्य जगभरात पसरवून राष्ट्राला परमवैभवाला नेण्यासाठी कार्यकर्ते अविरत कार्यरत आहेत, असे प्रतिपादन असवले यांनी केले.

       कार्यक्रमात मुग्धा पुंडे यांच्या ओघवत्या शैलीतील किर्तनाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना मनोज कदम यांनी तबला साथ तर चंद्रकांत जोशी (काका) यांनी पेटी वादन करून उत्तम साथसंगत केली. त्यानंतर सामूहिक आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. 

      या सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे मावळ-मुळशी जिल्हा मंत्री महेंद्र असवले, जिल्हा बजरंग दल संयोजक अमित भेगडे आणि विहिप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राईलकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमोल रानडे, प्रा. डॉ. धनश्री (पाध्ये) होगले, मुग्धा पुंडे, मंगेश तेलंग, किरीट जोशी, ॲड. स्मृती जोशी, ॲड. कौमुदी पुंडे आणि तेजस राईलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील भाविक आणि नागरिकांनी या कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावली होती.

इतर बातम्या