गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च; कायदा-सुव्यवस्था राखण्याचा संदेश
लोणावळा : आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा व्हावा, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रूट मार्च काढला.
गणेशोत्सवाच्या काळात गर्दीची ठिकाणे, मिश्र वस्तीचे भाग, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे मार्ग तसेच संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ५.१५ ते ७.०० वाजेपर्यंत रूट मार्च घेण्यात आला.
या रूट मार्चदरम्यान पोलिसांनी प्रमुख मार्गांवरून संचलन करत नागरिकांना गणेशोत्सवासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश दिला. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याचे या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने
कार्ला फाटा ते वेहेरगाव पायथा मंदिर, कार्ला फाटा ते कार्ला गावठाण, के. के. मार्केट, कुसगाव ते ओळकाईवाडी चौक या मार्गांमध्ये मिरवणूक मार्ग, मिश्र वस्ती तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.
४५ पोलिस अधिकारी-अंमलदारांचा सहभाग
या रूट मार्चमध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याकडील ६ अधिकारी आणि १९ अंमलदार, तसेच २० होमगार्ड जवान सहभागी झाले. अशाप्रकारे एकूण ६ अधिकारी आणि ३९ अंमलदार, म्हणजेच ४५ जणांच्या पोलीस व होमगार्ड पथकाने रूट मार्चमध्ये सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करावे, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पाडावेत आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकाराला थारा देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या संचलनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, उत्सव काळात पोलिसांचा बंदोबस्त आणि गस्त अधिक प्रभावी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



















