लोणावळा शहर व ग्रामीण भागात गौराईचे उत्साहात स्वागत l सोन्या-मोत्याच्या पावलांनी गौराई आली; कार्ला परिसरात माहेरवाशिणीच्या स्वागताचा उत्साह
कार्ला : “सोन्या-मोत्याच्या पावलांनी, धन-धान्याच्या पावलांनी गौराई आली...” असे म्हणत गणरायाच्या आगमनानंतर महाराष्ट्रातील घराघरांत सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या आनंदात आता गौराईच्या आगमनाने आणखी चैतन्य निर्माण झाले आहे. कार्ला परिसरात माहेरवाशिणीच्या रूपाने आलेल्या गौराईचे महिला व ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत केले.
गौराई म्हणजे घरातील लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे गौराईच्या आगमनाची तयारी महिलांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. घराची स्वच्छता, सजावट तसेच गौराईच्या स्वागतासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव करण्यात आली होती. गौराईच्या पूजनासाठी लागणारी फुले, शिंग्रोबाची पाने, लव्हाळी आदी साहित्य घेण्यासाठी दुपारनंतर गावातील सुवासिनी तलावाच्या ठिकाणी एकत्रित झाल्या. पूजेसाठी आवश्यक साहित्य घेऊन त्या विधिवत पूजन करून, आरती म्हणत आणि पारंपरिक गाणी गात गौराईला घरी घेऊन आल्या. यावेळी महिलांनी फेर धरत फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.
गौराईला घरी आणताना लहान मुलांचाही उत्साह पाहायला मिळाला. मुलांनी थाळ्या व टाळ वाजवत गौराईचे स्वागत केले. पारंपरिक गाणी, आरती आणि महिलांचा उत्साह यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. घरी आगमन झाल्यानंतर गौराईच्या आकर्षक सजावटीसाठी महिलांनी विशेष मेहनत घेतली. विविध प्रकारच्या फुलांनी गौराईची सजावट करण्यात आली. काठपदराच्या आकर्षक साड्या, गळ्यात मोहनमाळ व मंगळसूत्र, कमरेला कमरपट्टा, केसांत गजरे, हार-वेण्या आदी पारंपरिक दागिने आणि अलंकारांनी गौराईचे मोहक रूप सजविण्यात आले.
गौराईच्या आगमनाने कार्ला परिसरातील घराघरांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माहेरवाशिणीच्या स्वागताची ही पारंपरिक परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.




















