Lonavala News l लोणावळा शहरात जमिनीचा ताबा घेणाऱ्या टोळ्या सक्रिय; गुंड प्रवृत्तीचा शिरकाव
लोणावळा : मुंबई व पुणे या दोन शहराच्या मध्यभागावर असलेल्या व जागतिक नकाशावर थंड हवेचे ठिकाण, पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या लोणावळा व ग्रामीण परिसरातील अनेक जमिनी, जुने बंगले, रिकाम्या मोकळ्या जागा बळकवण्यासाठी, त्यावर ताबे घेण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. तसेच अनेक प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप देखील होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतीच लोणावळा शहरातील रायवूड भागात लाल चिमणी नावाच्या बंगल्यावर बेकायदेशीर रित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न लोणावळा शहरातील लोकप्रतिनिधी व पोलीस यांच्या ठोस कारवाईमुळे नागपंचमीच्या दिवशी हाणून पाडला गेला. मात्र याच बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका बंगल्यावर याच टोळीने तीन महिन्यापूर्वी बेकायदेशीर रित्या ताबा घेतला आहे. लोणावळा शहर हे ब्रिटिश काळात वसलेले व्यापारी शहर आहे. या ठिकाणी खंडाळा, जुना खंडाळा, रायवूड, भुशी, तुंगार्ली, अंबरवाडी या भागांमध्ये जुन्या मालमत्ता आहेत. अनेक मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पूर्वजांनी या मालमत्ता घेतल्या आहेत तसेच अनेक जण हे भारताबाहेर देखील राहतात, त्यामुळे अनेक मालमत्ता ह्या मूळ मालकापासून दुर्लक्षित राहिल्या आहेत. शहरातील जुन्या मालमत्तांचे रक्षण करण्याचे काम लोणावळा शहरातील काही स्थानिक नागरिक मागील काही वर्षांपासून अथवा काही पिढ्यांपासून करत आहेत. कालांतराने आता त्या जागा जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जागा जमिनी खरेदी करण्याकडे काही बड्या धेंड्यांचे लक्ष गेले आहे. अनेक मोठे राजकीय लोक देखील यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत किंवा हस्ते परहस्ते सदरच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
यामधूनच खरंतर लोणावळा शहरांमध्ये जागेचा ताबा मिळवणाऱ्या टोळ्या सक्रिय होऊ लागल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना हाताची धरत सर्वसामान्य माळी व केअर टेकर यांच्यावर दबाव आणत, त्यांना दमदाटी करत, मारहाण करत बेकायदेशीररित्या त्यांना सदर मालमत्तांमधून हद्दपार करत मालमत्तेचा ताबा घेऊन दिला जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामध्ये होत असल्याची चर्चा शहरामध्ये आहे. याकरिता कायदेशीर मार्गाचा वापर न करता दहशत निर्माण करून बेकायदेशीरपणे जागा खाली करून घेतल्या जात आहेत. सदरच्या टोळ्या ह्या गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित तसेच राजकीय वरदस्त लाभलेल्या असल्यामुळे त्यांना विरोध करण्याचे धाडस सर्वसामान्य नागरिक करत नाही. पोलीस प्रशासनाकडून देखील यावर कोणतेही कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे बाहेरच्या नागरिकांचा इंटरेस्ट लोणावळा शहरामध्ये वाढला आहे. काही स्थानिक एजंट देखील यामध्ये सहभागी असल्याची चर्चा रंगत आहे.
लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या शहरांमध्ये अशा शेकडो मालमत्ता आहेत. ज्याचे रक्षण करण्याचे काम लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंब इमाने इतबारे करत आहेत. त्या कुटुंबांच्या दोन, तीन, चार पिढ्या या मालमत्तांचे रक्षण व संगोपन करण्यात खपल्या आहेत. अशा कुटुंबांना त्यांचा कायदेशीर हक्क अथवा कायदेशीर मोबदला न देता गुन्हेगारांना हाताशी धरून जागेचे ताबे मिळवले जात आहेत. अतिशय भयंकर असे प्रकार शहरात व ग्रामीण परिसरात सुरू आहेत. मागील काळात देखील अनेक घटना घडल्या आहेत, काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. काही ठिकाणी सामंजस्यातून प्रकरणे मिटवण्यात आली आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे लोणावळा शहरांमध्ये व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये कोणती हयगय न करता दोषींवर कठोर कारवाई करावी. गुन्हेगारी टोळ्यांना ठेचून काढावे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा व लोणावळा शहरामध्ये खाकी वर्दीचा रोख कायम ठेवावा असे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
सोमवारी 17 ऑगस्ट रोजी लोणावळा शहरामध्ये घडलेला प्रकार अतिशय भयंकर होता. जागेचा ताबा घेण्यासाठी महिला बाउन्सर चा वापर करण्यात आला. अतिशय अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरत या महिला सदर माळी काम करणाऱ्या नागरिकांना घराबाहेर काढत होत्या. या घटनेचा संताप लोणावळा शहरांमध्ये निर्माण झाला. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र हा गुन्हा दाखल होण्यास बारा तास लागले. कोणत्यातरी अदृश्य शक्तीच्या प्रभावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप लोणावळा शहरातील नगरसेवकांनी पोलीस प्रशासनावर केला आहे. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर या प्रकरणी सदर ताबा घेण्यासाठी आलेल्या बाऊन्सरवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र ही बाउन्सर कंपनी नेमकी कोणाची आहे? कोणाच्या सांगण्यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात बाउन्सर त्या मालमत्तेमध्ये घुसले ? कोणाच्या सांगण्यावरून नागरिकांना मारहाण व शिवीगाळ केली, याची कोणतीही माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली नाही. समोर दिसणारे चेहरे हे जरी बाउन्सर्स असले तरी त्या मागील मास्टर माईंड कोण? कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार शहरामध्ये घडला आहे. कोणत्या एजन्सीचे हे बाऊन्सर होते. या सर्व प्रकरणातील मास्टरमाइंड चा शोध घेत त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व संबंधित पिडीत कुटुंबाने केली आहे. लोणावळा शहरामध्ये असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याकरता पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात व कायद्याचा वचक निर्माण करावा अशी देखील अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



















