Expressway Breaking News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दरड कोसळली; मुंबईकडे जाणार्या तिनही लेन बंद

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज रात्री 10.35 वाजण्याच्या सुमारास खोपोली भागात आडोशी गावचे हद्दीत km. No. 41/00 जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेन वरती पडला आहे. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. सदरचा मातीचा लगदा हा आय आर बी चे जेसीबी, डंपर च्या सहाय्याने काढून घेण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. साधारणतः 20 ते 25 डंपर भरतील ऐवढा मातीचा लगदा रोड मध्ये पडलेला असल्याने तीनही लेन बंद झाल्या आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस स्टेशन चा स्टाफ व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम चालू आहे. दरम्यान एक्सप्रेस वेवरील सर्व वाहतूक खोपोली शहरातून वळविण्यात आली आहे.