Breaking news

रायगड जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ, नव नियुक्त मुंबई पोलिस अधिकारी ओंकार निंबळे आणि महाराष्ट्र केसरी उपविजेता सोहेल शेख यांचा भव्य सत्कार

खोपोली : कुस्ती महर्षी स्व. भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वागत समारंभात रायगड जिल्ह्याचे नविन क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांचे, मुंबई पोलिस दलात नुकतीच नियुक्ती झालेल्या ओंकार निंबळे यांचे, तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेता सोहेल शेख यांचे सन्मानाने स्वागत करण्यात आले. खालापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

      कार्यक्रमात बोलताना जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी सांगितले की, “क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि सुविधा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या कुस्ती संकुलातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल.” त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर एक क्रीडाप्रेमी म्हणूनही योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

      उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी क्रीडाप्रती रुची आणि मोबाईलच्या आहारी जाणाऱ्या पिढीला मैदानी खेळांकडे वळवण्याचे महत्व अधोरेखित केले. “ही पिढी शारीरिक मेहनतीसोबत शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी होत आहे, हे कौतुकास्पद आहे,” असे ते म्हणाले.

     कार्यक्रमाला खोपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, गोदरेज अँड बॉईज कंपनीचे CSR प्रमुख तानाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल, महेंद्र सावंत यांनी देखील मनोगते व्यक्त केली. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी, भाजप शहराध्यक्षा अश्विनी अत्रे, कुस्ती अभ्यासक लोखंडे काका हे देखील व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी “आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल,” असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुनाथ साठेलकर यांनी केले. या प्रसंगी कुस्ती संकुलातील खेळाडू, पालकवर्ग आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या

Sangmeshwar l राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी प्रयत्नशील; छत्रपती संभाजी स्मारक भव्य दिव्य करण्यासाठी पुरातत्व व बांधकाम विभागाने अभ्यास करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार