पुणे जिल्ह्यातील उद्योजकांसाठी विशेष सभा; औद्योगिक समस्यांवर चर्चा – नांगरगाव औद्योगिक वसाहती मधील समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

पुणे : पुणे जिल्ह्यातील औद्योगिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या वतीने ही सभा एस.एल. किर्लोस्कर इंटरनॅशनल कम्युनिकेशन सेंटर, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडली.
या बैठकीस मा. डॉ. राजेंद्र भोसले (PMC आयुक्त), मा. श्री. जितेंद्र दुडी (जिल्हाधिकारी, पुणे), मा. डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार (विभागीय आयुक्त, पुणे) आणि मा. श्री. एस. जी. राजपूत (उद्योग सहसंचालक, उद्योग विभाग, पुणे) तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष श्री. संदीप संभाजी कोराड आणि उपाध्यक्षा श्रीमती शीतल अनिल पतंगे यांनी वसाहतीतील प्रमुख समस्यांचा आढावा घेतला. त्यांनी सभेमध्ये वसाहतीसमोरील अडचणी मांडल्या, ज्यावर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुडी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ही सभा पुणे जिल्ह्यातील उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, प्रशासन आणि उद्योजकांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊले असणार आहे.