लोणावळा शहरातील 100 वर्ष पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कैवल्यधाम योग संस्थेला लायन्स एक्सलन्स पुरस्कार प्रदान

लोणावळा : लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेली आणि योगशास्त्र क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेली कैवल्यधाम योग संस्था या वर्षी आपल्या शताब्दी महोत्सवात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या पार्श्वभूमीवर, लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने संस्थेला "लायन्स एक्सलन्स पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान लायन्स क्लबच्या 2025-26 मंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने, शुक्रवारी (13 जून) रोजी लोणावळ्यात प्रदान करण्यात आला. लायन्स क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा लायन साधना टाटीया आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष पीआयडी एमजेएफ लायन नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. कैवल्यधाम संस्थेच्या वतीने पुरस्कार कैवल्य विद्या निकेतनचे संचालक डॉ. नारायण जोशी यांनी स्वीकारला. या प्रसंगी प्राचार्या श्रीमती भारती कवाडे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान देण्यात आला.
कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, भाजप नाणे मावळ अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष लायन नरेंद्र भंडारी यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शंभर वर्षांच्या कार्याची स्तुती केली. त्यांनी संस्थेचे योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगत, लायन्स क्लब आणि कैवल्यधाम संस्थेमध्ये भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्य वाढवण्याचा संकल्पही व्यक्त केला. याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा माहितीपट दाखवण्यात आला. तसेच डॉ. एन. डी. जोशी यांनी संस्थेची संक्षिप्त माहिती देताना योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले आणि लायन्स क्लबचा मन:पूर्वक आभार मानला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विकास नय्यर यांनी तर आभार प्रदर्शन लायन नवीन भुरट यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीत म्हणत करण्यात आली.
जागतिक किर्ती असलेली कैवल्यधाम योग संस्था
कैवल्यधाम ही जागतिक कीर्ती असलेली लोणावळा शहरातील योग संस्था आहे. योग व विज्ञान याचा मेळ घालत वेगवेगळे संशोधन करत जगभरामध्ये या संस्थेने योगाचे जाळे निर्माण केले आहे. 1924 साली स्वामी कुवल्यानंद यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्था यावर्षी आपले शतक महोत्सव साजरे करत आहे. या महोत्सवानिमित्त भारतभरामध्ये विविध स्वरूपाचे उपक्रम राबवले जात आहेत. कैवल्यधाम या संस्थेमध्ये देशाचे राष्ट्रपती तसेच राज्याचे राज्यपाल व विविध सनदी अधिकारी माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी देखील भेट देत संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे.