Lonavala Election Updates l स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर

लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक दोन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार; 2011 च्या जनगणनेनुसार होणार प्रभाग रचना
लोणावळा : महाराष्ट्र राज्यामधील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याच्या आदेश दिले आहेत. त्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदा नगरपंचायती यांचे प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोणावळा नगर परिषदेची होणारी सार्वत्रिक निवडणूक ही दोन सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार नवीन प्रभाग रचना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम क्र. 10 व 12 दिनांक 25/01/2022 अन्वये नगरपरिषद प्रभागातील सदस्य संख्या व निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार लोणावळा शहरामध्ये 13 प्रभागातून सदस्य संख्या ही 27 असणार आहे. 11 जून पासून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले असून एक सप्टेंबर पर्यंत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करायचे आहे. त्यामुळे साधारणतः सप्टेंबर महिन्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता बळवली आहे.
जानेवारी 2022 सालापासून लोणावळा नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. मागील तब्बल साडेतीन वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी नव्हते. न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका पुढील चार महिन्यांमध्ये होणार असल्यामुळे इच्छुकांच्या अशा पल्लवीत झाले आहेत. 2022 साली निवडणुका होणार असे गृहीत धरून ज्या इच्छुक उमेदवारांनी प्रभाग निहाय जनसंपर्क व कामे करण्यास सुरुवात केली होती. त्यांना निवडणुका लांबल्यामुळे ब्रेक लागला होता. आता मात्र निवडणुका घेण्याचे आदेश खुद्द न्यायालयानेच दिल्याने व त्यानंतर लागलीच निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेच्या कामाबाबत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे येणारा पावसाळा, गणेश उत्सव, नवरात्री, दसरा व दिवाळी या सणांच्या निमित्त इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या मार्गाने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.
लोणावळा शहर हे पर्यटनाचे स्थळ आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या व येणाऱ्या पर्यटकांच्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. या दोन्ही पातळीवर काम करत सर्वसामान्य लोणावळा कर नागरिक व देशभरातून येणारे पर्यटक यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार निवडून देण्याची संधी या सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. योग्य प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्या भागातील विकास कामांना देखील चांगल्या पद्धतीने गती व चालना मिळत असते याकरिता मतदारांनी सत सत विवेक बुद्धीचा वापर करत योग्य व सक्षम उमेदवाराला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणे गरजेचे आहे. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक ही महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये होणार की स्वबळावर लढवली जाणार किंवा समविचारी पक्षांची वेगळी आघाडी करून लढवली जाणार याबाबत अद्याप कोणताही खुलासा कोणत्याही राजकीय पक्षाकडून झालेला नाही. ऐनवेळी परिस्थितीनुसार राजकीय निर्णय होत असतात त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये होणारे निवडणूक ही सर्वांसाठी उत्सुकता वाढवणारी निवडणूक असणार आहे.