Lonavala Good News l लोणावळ्यातील लेखिका-कवयित्री सिंधू विठ्ठल जाधव यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान
लोणावळा : वरुड (जि. अमरावती) येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल लोणावळा येथील लेखिका व कवयित्री सिंधू विठ्ठल जाधव यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी येथील द कल्चर हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिंधू जाधव यांनी साहित्य क्षेत्रात सातत्याने लेखन करत विशेषतः काव्यलेखनातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या काव्यलेखनाचा गौरव म्हणून यंदाच्या ‘राष्ट्र गौरव पुरस्कारासाठी’ त्यांची निवड करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यात साहित्य, सामाजिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज ठाकरे, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलकाताई नाईक, भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे लोणावळ्यातील साहित्यिक वर्तुळातून सिंधू विठ्ठल जाधव यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या काव्यलेखनाला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

















