Lonavala College News l विद्यार्थ्यांनो पदवीसोबत व्यावसायिक कौशल्य आत्मसात करूनच महाविद्यालयाबाहेर पडा : डॉ. पराग काळकर
लोणावळा : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून, पदवीसोबत व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक ज्ञान, भाषेवरील प्रभुत्व आणि समस्या सोडविण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीतही सातत्याने बदल करणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून बाहेर पडताना पदवीसोबत एखादे ठोस कौशल्य घेऊनच बाहेर पडावे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी केले.
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या लोणावळा महाविद्यालयाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या विविध संस्थांच्या प्रमुख व सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काळकर बोलत होते. ट्रस्टच्या सचिव ॲड. नीलिमा खिरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. वृक्षारोपणाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
डॉ. काळकर म्हणाले की, भारतातील विविध ठिकाणांचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीने लोणावळ्याला विशेष महत्त्व आहे. येथील हवा, पाणी आणि आल्हाददायी वातावरणामुळे निरोगी आरोग्यासाठी अनेक नागरिक येथे येतात. अशा वातावरणात चांगले विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांनी पार पाडली पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. आज नोकरी मिळविण्यासाठी केवळ पारंपरिक ज्ञान पुरेसे नाही, तर तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य आवश्यक झाले आहे. महाविद्यालयांनी स्वायत्त होण्याच्या दिशेने प्रयत्न करून परिसरातील उद्योगांच्या गरजांशी संबंधित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत. बीबीए, बीबीए कॉम्प्युटर यांसारखे अभ्यासक्रम तसेच रोजगाराभिमुख कौशल्यांचा शिक्षणात समावेश करण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आज बँकिंग, विमा यांसह अनेक क्षेत्रांतील पारंपरिक स्वरूपाची कामे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन होत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत जगाचे स्वरूप कसे असेल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. या बदलांकडे दुर्लक्ष न करता शिक्षण व्यवस्थेनेही त्यानुसार स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे डॉ. काळकर यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञान आपल्या सवयी बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारे कौशल्य असणे गरजेचे आहे. अन्यथा केवळ शिक्षण आणि पदवीचा उपयोग मर्यादित राहील, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवावे, शक्य तितक्या विविध भाषा शिकाव्यात, समूहामध्ये काम करण्याची सवय लावून घ्यावी आणि ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ या भावनेने काम करावे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडविण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे. नवीन प्रश्न निर्माण झाल्यास त्यावर उपाय शोधण्याची मानसिकता विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. आजचे ज्ञान काही वर्षांत जुने होऊ शकते. त्यामुळे बदलते ज्ञान सतत आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मोकळ्या वेळेचा उपयोग नवीन कौशल्ये शिकण्यासाठी करावा आणि बदल स्वीकारण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही डॉ. काळकर यांनी दिला.
मोबाईलचा वापर कौशल्य विकासासाठी करा : ॲड. नीलिमा खिरे
ट्रस्टच्या सचिव व कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. नीलिमा खिरे म्हणाल्या की, कौशल्य विकसित केल्याशिवाय विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार नाही. विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनीही त्यासाठी सातत्याने स्वतःला तयार ठेवले पाहिजे. आयुष्यात संकटे अनेक असली तरी त्यावर मार्ग काढत पुढे जाण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी ठेवावी. मोबाईलचा वापर केवळ रिल्स पाहण्यासाठी किंवा बनविण्यासाठी न करता त्यातील तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्य विकास, ज्ञानवृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कमी शुल्कात शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न : दत्तात्रय पाळेकर
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय पाळेकर यांनी संस्थेच्या ४५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याबरोबरच संस्थेच्या प्रगतीत मोलाची साथ देणाऱ्या विविध संस्था व सदस्यांचा सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लोणावळा शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी शुल्कात शिक्षण मिळावे, फीअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी विश्वस्तांकडून भरली जाते. विश्वस्त कोणतेही मानधन अथवा भत्ता घेत नसून समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संस्था ४५ वर्षांची वाटचाल करीत असल्याचे पाळेकर यांनी सांगितले. पारंपरिक शिक्षणासोबतच AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शिक्षणाला देण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी लोणावळा शहरात अल्प दरात शिक्षण उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास पोलिस उपअधीक्षक भूषण माने, ट्रस्टचे उपाध्यक्ष नंदकुमार वाळुंज, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, सहखजिनदार अजय भोईर, विश्वस्त विशाल पाडाळे, नेहा पाळेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी केले, तर आभार प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र देशमुख यांनी मानले.

















