सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे एकदिवसीय फिरते ग्रंथालय
लोणावळा : राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT), केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, पुणे पुस्तक महोत्सव, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय फिरते ग्रंथालय उपक्रम सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या फिरत्या ग्रंथालयासोबत श्री. हरिभाऊ आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांची टीम उपस्थित होती. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व, पुस्तक वाचनाचे फायदे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच पुणे पुस्तक महोत्सवाची माहिती देत विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचनासाठी प्रेरित केले.
या उपक्रमास STES लोणावळा कॅम्पसचे संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, SIT चे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची प्रमुख उपस्थिती होती. फिरत्या ग्रंथालयामध्ये साहित्य, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, कादंबरी तसेच विविध ज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपलब्ध पुस्तकांची उत्सुकतेने पाहणी करत आपल्या आवडीची पुस्तके खरेदी केली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, ज्ञानवृद्धी, स्व-अध्ययनाची सवय आणि पुस्तक संस्कृती रुजविण्यास मदत झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनासाठी विविध प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी केले. NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष दबडे आणि प्रा. एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन केले. या उपक्रमामुळे SIT लोणावळा परिसरात वाचन संस्कृतीला चालना मिळाली.

















