लोणावळा हे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले शहर – सूर्यकांत वाघमारे

लोणावळा : देशाच्या व जगाच्या नकाशावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी ओळख असलेले लोणावळा हे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले शहर असल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सरचिटणीस व लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. वाघमारे म्हणाले लोणावळा शहरामध्ये एकही अभियांत्रिकी महाविद्यालय नाही, एकही लॉ कॉलेज नाही, एकही मेडिकल कॉलेज नाही, कोणतीही मोठी शैक्षणिक संस्था नाही ही लोणावळा शहराची शोकांतिका आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी यश संपादित करत असताना लोणावळा शहरांमध्ये या अभ्यासक्रमाची साधी जनजागृती सुद्धा केली जात नाही. लोणावळा शहर हे आजपर्यंत विधानसभा व लोकसभा उमेदवारांना आघाड्या देत आले आहे. निवडून आल्यानंतर मात्र सर्व शैक्षणिक व वैद्यकीय संस्था या मावळ तालुक्याच्या पूर्व भागामध्ये स्थापित झाले आहेत. पश्चिमेकडचे शेवटचे टोक असलेल्या लोणावळा शहराकडे तालुक्यातील सर्वच मोठ्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केली आहे. शिक्षणाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी लोणावळा शहरातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. जोपर्यंत राजकीय सोशल इंजिनिअरिंग होणार नाही तोपर्यंत आपली दखल घेतली जाणार नाही अशा शब्दात सूर्यकांत वाघमारे यांनी सर्वच राजकीय पक्षांना याकरिता एकत्र येण्याचे आव्हान केले आहे.
वाघमारे म्हणाले आज शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, या शैक्षणिक संधी सोबतच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. लोणावळा शहरांमधून जो इन्स्पेक्टर होईल अथवा तहसीलदार होईल त्यांना एक लाख रुपये रोख बक्षीस दिले जाईल. जो उपजिल्हाधिकारी होईल अथवा त्या दर्जाचा अधिकारी होईल त्याला अडीच लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. जो पोलीस अधीक्षक अथवा जिल्हाधिकारी होईल त्यांना पाच लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल अशी योजना देखील त्यांनी जाहीर केली आहे. लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये येत शहराचे तालुक्याचे या राज्याचे नेतृत्व करावे असे आव्हान त्यांनी दहावी बारावी मध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यासपीठावरून केले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य असे मार्गदर्शक देखील शहरांमध्ये आणून मुलांना मार्गदर्शन देऊ असे देखील त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला एवढीच माहिती आपण विद्यार्थ्यांना देत असतो. मात्र हे तीनही महापुरुष एक उत्तम अभियंते होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये बांधलेल्या वास्तू आज देखील उत्तमरीत्या दिमाखात उभ्या आहेत. हे देखील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेल्या या कार्याची देखील माहिती विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असल्याचे मत वाघमारे यांनी व्यक्त केले.