लोणावळा व मावळ तालुक्यातून स्पर्धा परीक्षा यशस्वी होणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत रोख रकमेची बक्षिसे देणार – सूर्यकांत वाघमारे

लोणावळा : लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या पुढील काळामध्ये स्पर्धा परीक्षांची कास धरत वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करावी. अशा विद्यार्थ्यांना एक लाख रुपये ते पाच लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्याची योजना राजकीय सोशल इंजीनियरिंगच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांनी घोषित केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य ते मार्गदर्शक देखील उपलब्ध करून दिले जातील असा शैक्षणिक क्षेत्रामधील सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग मावळ तालुक्यात राबवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. सूर्यकांत वाघमारे म्हणाले लोणावळा शहर व मावळ तालुका हे जिल्ह्याला व राज्याला दिशा देणारा भाग आहे मात्र येथील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होत नाहीत ही खंत कायम मनामध्ये आहे याकरिताच यापुढील काळामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या व यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरील योजना लागू करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) व सम्यक क्रांती फौंडेशन लोणावळा च्या वतीने 2 जुलै रोजी लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन लोणावळा शहरामध्ये करण्यात आले होते त्यावेळी बोलताना सूर्यकांत वाघमारे यांनी वरील मत व्यक्त केले.
या सत्कार सोहळ्याची सुरुवात गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली तसेच पालकांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक हेच आजचे खरे मान्यवर असल्याचे यानिमित्ताने दर्शविण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व मावळ तालुका अध्यक्ष तसेच संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण उर्फ नारायण भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लोणावळा शहराध्यक्ष व सम्यक क्रांती फाउंडेशनचे कमलशिला म्हस्के, लोणावळा शहर व मावळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी केले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ज्येष्ठ नेत्या यमुनाताई साळवे, संजय अडसुळे, मालन ताई बनसोडे, तुपेल शेख, तेजस्विनी देसाई यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम वाघमारे व मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी केले.