महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचा बाल स्नेही पुरस्कार बालकल्याण समिती क्रमांक दोन पुणे यांना जाहीर

मावळ माझा न्युज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने यंदाचा बालस्नेही हा पुरस्कार बालकल्याण समिती क्रमांक दोन पुणे यांना जाहीर झाला आहे.
बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 27(9) नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे अधिकार प्राप्त असलेल्या या समितीने मागील 3 वर्षांत 7 हजार पेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत. जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक बालगृह, शिशुगृह, पुणे ग्रामीण अंतर्गत असलेली सर्व पोलिस ठाणी तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणारी सर्व पोलिस ठाणी ही समितीच्या कार्यक्षेत्रात आहेत.
समितीने बाल संरक्षण, अनाथ आणि निराधार बालकांचे पुनर्वसन, बालविवाह, बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगीक अत्याचाराने पीडित अल्पवयीन बालके यांची सुरक्षितता, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य, पुनर्स्थापन आणि पुनर्वासाच्या दिशेने प्रभावी उपक्रम राबवले आहेत. समिती बालकांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आणि जलदगतीने अचूक निर्णय देण्यात अग्रेसर आहे.
पुरस्कारप्राप्त समिती सदस्य व अधिकारी :
अध्यक्ष : नंदिता अंबिके, सदस्य - ॲड. परेश खाडिलकर, संध्या गायकवाड, सारिका अगज्ञान, सहाय्यक लेखनिक - अर्चना राऊत यासोबतच पुणे जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा : हा मानाचा पुरस्कार 3 मार्च 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.