आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या "अवकारीका" चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

पिंपरी : समाजातील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी लघुपट आणि चित्रपट निर्मिती करणाऱ्या रेडबड मोशन पिक्चर्स प्रस्तुत "अवकारीका" या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण आकुर्डी येथे एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. हा चित्रपट सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, मेहनत आणि समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीला अधोरेखित करतो.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय परिषद सदस्य आयसीएआय सीए शिवाजी झावरे, संत साहित्याचे अभ्यासक प्रा संपत गर्जे, लोकमत पिंपरी चिंचवडचे वृत्त संपादक श्रीनिवास नागे, उद्योजक अमित भोसले, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, अवकारिका चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक सीए अरविंद भोसले, चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेते विराट मडके, डॉ. नितीन लोंढे, अभिनेते रोहित पवार, राहुल फलटणकर, अभिनेत्री पिया कौसुंबकर, स्नेहा बालपांडे, पूजा वाघ, चित्रपटाच्या तांत्रिक टीम मधून डीओपी करण तांदळे, निर्मिती व्यवस्थापक चेतन परदेशी, सहाय्यक दिग्दर्शक रहमान, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे, ध्वनी मुद्रक योगेश क्षीरसागर, पोस्ट प्रोडक्शन चे नावेद अत्तार, सोशल मीडिया चे आनंद मुरुडकर आणि सुरज कुंभार, प्रफुल्ल कांबळे, विनोद खुरुंगळे, बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"अवकारीका" - एक वेगळा दृष्टिकोन
या अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. संपत गर्जे यांनी चित्रपटाच्या संकल्पनेचे कौतुक करताना सांगितले, “एका कवीला जसे कोणतीही गोष्ट वेगळ्या दृष्टिकोनातून दिसते आणि तो तिचे साहित्यामध्ये रूपांतर करतो, तसेच या चित्रपटाच्या टीमनेही हा विषय प्रभावीपणे पडद्यावर मांडला आहे. हा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रयत्न आहे.” सीए एस. बी. झावरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत चित्रपट निर्मात्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने ती अंगीकारली पाहिजे. ‘अवकारीका’सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, याचा मला अभिमान वाटतो. मी संपूर्ण टीमचे आणि विशेषतः स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेदनादायक वास्तव
कार्यक्रमादरम्यान स्वच्छता कर्मचारी रवींद्र भाट यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “समाज अजूनही स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे उपेक्षित नजरेने पाहतो. ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. आम्ही स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून इतर नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी झटत असतो. ‘अवकारीका’ हा पहिला असा चित्रपट आहे, जो आमच्या व्यथा आणि संघर्ष मोठ्या पडद्यावर मांडत आहे.”
"अवकारीका" - समाज प्रबोधनासाठी एक महत्त्वाचे पाऊल
रेडबड मोशन पिक्चर्सचा हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून, समाजाच्या नजरेसमोर एक वास्तव चित्र उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सफाई कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कठीण जीवनाची जाणीव जनतेला होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. "अवकारीका" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि हा चित्रपट समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.