‘गुलकंद’मध्येही हास्यजत्रेच्या विनोदांची स्वच्छता आणि शुद्धता – प्रसाद ओक यांचे गौरवोद्गार

चिंचवड | प्रतिनिधी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने गेल्या सात वर्षांत प्रेक्षकांच्या मनात हसतं-हसवतं स्थान निर्माण केलं. संकटाच्या काळातही या कार्यक्रमाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्याच स्वच्छ आणि शुद्ध विनोदांची परंपरा ‘गुलकंद’ चित्रपटातही पाहायला मिळते, असे प्रतिपादन अभिनेता प्रसाद ओक यांनी चिंचवड येथे एका विशेष कार्यक्रमात केले.
दिशा सोशल फाउंडेशनतर्फे ‘निमित्त गुलकंदचे – दिलखुलास गप्पा हास्यजत्रा टीमसोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी प्रसाद ओक, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, शार्विल आगटे, गायिका सावनी रवींद्र हे मंचावर उपस्थित होते. लेखक-संवादक सचिन मोटे यांनी कलाकारांशी दिलखुलास संवाद साधला.
कार्यक्रमात ‘गुलकंद’ चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास, चित्रिकरणातील मजेशीर अनुभव, कलाकारांचे किस्से, परस्पर टोकाच्या विनोदांचे फटाके यामुळे सभागृह हास्याच्या लाटांनी गाजले. सावनी रवींद्र यांनी ‘गुलकंद’चे शीर्षकगीत सादर करत रंगत वाढवली. ‘आमच्यात कोणीच नाही मंद, एक मेपासून पाहा गुलकंद’ या शार्विलच्या टप्प्यामुळे सर्वत्र हास्यकल्लोळ उसळला.
कार्यक्रमाच्या वेळी राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते ओक आणि चौघुले यांचा, तर चंद्ररंगचे संचालक विजय पांडुरंग जगताप यांच्या हस्ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचा सत्कार झाला. माजी महापौर मंगला कदम आणि अपर्णा डोके यांनी सई ताम्हणकर व ईशा डे यांचा गौरव केला. तसेच टपाल खात्यातून सेवानिवृत्त झालेले दिशाचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला राहुल कलाटे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, अमित गावडे, समीर मासूळकर, राजेंद्र साळुंके, बळीराम जाधव, संतोष कांबळे, राजू गोलांडे, राजू बनसोडे, कांतीलाल गुजर, नितीन धुंदुके यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार सई ताम्हणकर यांनी मानले.
कलाकारांच्या प्रतिक्रिया :
समीर चौघुले:
"२९ वर्षांच्या कारकिर्दीत ५००० हून अधिक नाट्यप्रयोग, १६ चित्रपट, पाच वर्षे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, आणि सात वर्षे ‘हास्यजत्रा’! ‘गुलकंद’मध्ये नायक म्हणून भूमिका करणं, हे निर्मात्यांचं धाडसच म्हणावं लागेल. हा अनुभव समृद्ध करणारा ठरला."
सई ताम्हणकर:
"कलाकाराने साच्यात अडकू नये. प्रयोगशील राहणं, स्वत:वर विश्वास ठेवणं आणि कामावर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. ‘हास्यजत्रे’मुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आला."
प्रसाद ओक:
"माझ्या वाट्याला आलेली भूमिका लहान की मोठी यापेक्षा तिचं महत्त्व काय आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. 'कच्चा लिंबू'ने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर दर्जेदार काम केलं पाहिजे."
सचिन गोस्वामी:
"सिनेमा तयार करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. संजय छाब्रिया आणि त्यांच्या ‘एव्हरेस्ट’ टीममुळे ‘गुलकंद’चे प्रमोशन उत्तम झाले."
सावनी रवींद्र:
"‘गुलकंद’मधील गाण्याला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक आहे. हे गाणं ऐकताना एक वेगळीच आनंददायक अनुभूती मिळते."