Breaking news

पर्यावरण संवर्धनासाठी रोटरीचा मोठा पुढाकार l साते येथे ३,१३१ वृक्षांचे भव्य रोपण; संगोपनाची जबाबदारी सीआरपीएफकडे

लोणावळा : पर्यावरण संवर्धन, मृदा व जलसंवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ लोणावळा व रोटरी क्लब ऑफ तळेगाव गोल्डन तसेच इतर होस्ट आणि को-होस्ट क्लब्स यांच्या संयुक्त विद्यमाने साते गाव व सीआरपीएफ (CRPF) परिसरात भव्य 'मेगा वृक्षारोपण अभियान' अत्यंत उत्साहात पार पडले. या विशेष उपक्रमांतर्गत एकूण ३,१३१ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

या अभियानासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. नितीन धामले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, जवान, तसेच डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील विविध रोटरी क्लब्सचे पदाधिकारी आणि रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि डोंगर परिसरात वृक्षारोपण

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल आपुलकी आणि जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साते येथे प्रतीकात्मक स्वरूपात १२ वृक्षांची लागवड करण्यात आली. याशिवाय, साते गावालगत असलेल्या डोंगर परिसरात ३,१३१ वृक्षांची लागवड सीआरपीएफच्या जवानांमार्फत केली जात आहे. केवळ वृक्षलागवड करून न थांबता, या लावलेल्या सर्व वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांनी स्वीकारली आहे, ज्यामुळे या उपक्रमाचे यश निश्चित मानले जात आहे.

भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात या हिरवाईचा व स्वच्छ पर्यावरणाचा लाभ हजारो नागरिकांना होणार आहे. रोटरीच्या "Create Lasting Impact" (शाश्वत प्रभाव निर्माण करा) या ब्रीदवाक्याला साजेसे असे हे काम ठरले असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हे एक अत्यंत प्रेरणादायी पाऊल ठरले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रोटरी क्लब्स, सीआरपीएफचे अधिकारी व जवान, स्वयंसेवक तसेच साते ग्रामस्थांचे रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

इतर बातम्या