पवना बंदिस्त पाईप लाईनला मावळमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबरला विराट 'लॉन्ग मार्च'
पवनानगर : पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने ऐतिहासिक 'लॉन्ग मार्च' काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी देण्यास कोणताही विरोध नाही; मात्र नदीपात्राऐवजी थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याच्या निर्णयाला शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पामुळे पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होईल, शेतीसाठी तसेच मावळातील गावांच्या पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी याच प्रश्नावर झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्या ऐतिहासिक ठिकाणाहूनच २ ऑक्टोबर रोजी पवना धरणाच्या दिशेने हा विराट 'लॉन्ग मार्च' सुरू होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
'भ्रष्टाचारासाठी प्रकल्प रेटला जात आहे'
या प्रकल्पाच्या माध्यमातून काही लोकप्रतिनिधींना शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याची संधी मिळणार असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला. विकासाच्या नावाखाली जनतेच्या हिताला डावलून हा प्रकल्प जबरदस्तीने लादला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
५६ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित
१९७० पासून पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही निकाली न लागल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक पिढ्यांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू असतानाही शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला.
उद्योगपतींसाठी जमिनी लीजवर देण्याचा आरोप
पवना धरण परिसरातील शेकडो एकर जमीन उद्योगपतींना भाडेतत्त्वावर (लीज) देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही शेतकरी प्रतिनिधींनी केला. धरणग्रस्तांना न्याय नाकारला जात असताना उद्योगपतींना प्राधान्य दिले जात असल्याने मावळात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 'लॉन्ग मार्च'मुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता असून, या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, प्रकाश तात्या बालवडकर, ज्ञानदेव सोनवणे, पवना धरण कृती समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



















