मळवली रस्ता दुरुस्तीसाठीचे सचिन रगडे यांचे आमरण उपोषण मागे; रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
कार्ला : मळवली रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला पर्यायी रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक वाहने जीव मुठीत धरून प्रवास करत होती. या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सातत्याने डोळेझाक करत असल्याने मळवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अशोक रगडे यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेत आमरण उपोषण सुरू केले होते.
तथापि, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत त्या तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
प्रमुख मागण्या काय होत्या?
1)दोन्ही उपलब्ध पर्यायी रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करण्यात यावेत.
2) मळवली बाजारपेठेतील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत.
3) शनिवारी व रविवारी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेता, या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
प्रशासकीय मध्यस्थी व उपोषण समाप्ती
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते सचिन रगडे यांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली व त्या पूर्ण करण्याचे लेखी/तोंडी आश्वासन दिले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्ञानेश्वर राठोड, रेल्वे प्रशासनाचे दीपक आनंद, साईड इंजिनिअर रिषभ शिवारे, तलाठी दीपक धनवडे, पोलीस पाटील शहाजान इनामदार यांच्यासह स्थानिक मान्यवरांच्या हस्ते सरबत घेऊन सचिन रगडे यांनी आपले उपोषण सोडले.
यावेळी भाऊसाहेब हुलावळे, विजय तिकोणे, अस्लम शेख, रघुनाथ मराठे, रामदास थोरवे, बाळासाहेब आंबेकर, अनिल कांबळे, संजय मरगळे, तुकाराम ठोसर, अमर शेडगे, रघुनाथ घोडके, वैभव तिकोने, सचिन हुलावळे, प्रशांत शेडगे, सतीश रगडे, शुभम नखाते, सनी शेडगे यांसह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करून नागरिकांची या जीवघेण्या खड्ड्यातून मुक्तता करावी, अशी जोरदार मागणी आता मळवलीवासीयांकडून केली जात आहे.



















