Breaking news

PI Sachin Patil l लोणावळा शहर पोलीस निरीक्षकपदी सचिन पाटील रुजू; वाहतूक कोंडी आणि अमली पदार्थांच्या विरोधात कडक पावले उचलणार

लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली असून, त्यांच्या या नियुक्तीमुळे लोणावळा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, अशी आशा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

२० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव अन् सन्मानाचा आलेख

पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पोलीस दलात तब्बल २० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा आणि उत्कृष्ट कामगिरीचा आलेख कौतुकास्पद आहे. २०१३ साली त्यांच्या विशेष आणि उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना मानाचे 'पोलीस महासंचालक पदक' देऊन गौरविण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, गोंदिया, वालचंदनगर, वडगाव निंबाळकर, राजगड, कोल्हापूर, भुदरगड आणि शिवाजीनगर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. खाकी वर्दीतील एक कडक अधिकारी असण्यासोबतच ते एक उत्कृष्ट हॉकीपटू देखील आहेत.

अमली पदार्थ तस्करांवर आधीच जरब

सचिन पाटील यांनी यापूर्वी अमली पदार्थ विरोधी मोहिमांमध्ये अत्यंत धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. २०२१ मध्ये राजगड येथे कार्यरत असताना त्यांनी मोठी धाड टाकत ६ किलो चरस जप्त केले होते. खेड शिवापूर येथे अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहने पकडण्यात त्यांनी मोठे यश मिळवले होते. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता लोणावळ्याला होणार आहे. लोणावळा शहर पोलीस निरीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सचिन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शहरातील मुख्य समस्यांवर बोट ठेवत आपल्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली. लोणावळा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील जटिल वाहतूक समस्या सोडविण्याला माझे पहिले प्राधान्य असेल. तसेच, तरुणाईला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि वाहतुकी विरोधात लोणावळा शहरात अत्यंत कडक पावले उचलली जातील. गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत खतपाणी मिळू दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. 

       लोणावळा शहरात दर आठवड्याला हजारो पर्यटक येतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत सचिन पाटील यांच्यासारखा एक डॅशिंग, अनुभवी आणि पदकविजेता पोलीस अधिकारी शहराला मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहराला सुरक्षित आणि भयमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

इतर बातम्या