संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्था भविष्यात मोठी भरारी घेईल – दीपक फल्ले
लोणावळा : संपर्क औद्योगिक प्रशिक्षण संस्था भविष्यात मोठी भरारी घेत अनेक कुशल विद्यार्थी घडवेल, असा विश्वास आर्या इंडस्ट्रीजचे संचालक दीपक फल्ले यांनी व्यक्त केला. मळवली येथील संपर्क संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थी निरोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य देवांशू चॅटर्जी, अलाईड मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे मनुष्यबळ व्यवस्थापक संजय पाटोळे तसेच संपर्क संस्थेच्या विश्वस्त रत्ना बॅनर्जी उपस्थित होते.
दीपक फल्ले म्हणाले, "प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम आयुष्यातील ध्येय निश्चित केले पाहिजे. रचनात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने परिश्रम केल्यास जीवनात निश्चितच यश मिळते." त्यांनी विद्यार्थ्यांना जगातील यशस्वी उद्योगपती आणि खेळाडूंची पीपीटीद्वारे उदाहरणे देत स्वानुभवही सांगितले. मोठे यश मिळवायचे असेल तर आजपासूनच कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला.
संजय पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण पूर्ण करून उद्योगविश्वात प्रवेश करण्याचा टप्पा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळण असतो. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करून मेहनतीची तयारी ठेवावी.
अमितकुमार बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू करण्यासाठी संपर्क संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थ्यांनी काळानुरूप स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विंध्या बापट यांनी संपर्क औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपर्क संस्थेच्या विश्वस्त नवनिता चॅटर्जी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य विक्रम शेगावकर, सतीश माळी, कृष्णांत सातार्डेकर, प्रभाकर खंडारे, समाधान माहोर तसेच संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
























