दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप
लोणावळा : मावळ तालुक्यातील दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे मावळ तालुका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सहा जुलै रोजी पाटण गावात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात दरड गावात आल्यामुळे एक घर जमीन दोस्त झाले असून तीन नागरिकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घराच्या आजूबाजूला असलेली 15 ते 20 घरे देखील या राड्यारोड्यामुळे बाधित झाली आहेत. सदर दरड हटवण्याचे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास पुन्हा एक मोठी दरड या ठिकाणी खाली आली व यंत्रणाची पळापळ सुरू झाली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासनाने गावावर ओढवलेले हे संकट वाढू नये व कोणतीही जीवित हानी होऊ नये याकरिता ग्रामस्थांना गाव खाली करून सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र प्रशासनाकडून या नागरिकांची कोणतीही राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
250 कुटुंब असलेले हे गाव आपले नातेवाईक व सगे सोयऱ्यांकडे मागील चार दिवसापासून राहत आहे. पण किती दिवस आम्ही पाहुण्यांकडे राहणार आमची राहण्याची खाणे पिण्याची व्यवस्था प्रशासन करणार आहे की नाही असा संतप्त प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित करून प्रशासनाच्या विरोधात गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज विशेष ग्रामसभा घेत प्रशासनाचा निषेध नोंदवला. जोपर्यंत प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी गावात येत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह पाटण गावात येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द दिल्यानंतर नागरिक शांत झाले. दरम्यान पाटण गावातील नागरिकांसाठी आमदार सुनील शेळके यांनी अन्नधान्याचे किट तयार केले आहेत गावांमध्ये डोंगरावरून आलेला दरडेचा राडारोडा मशनरी लावून बाजूला करून घ्या त्यासाठी जो काही खर्च लागेल तो मी देतो असा शब्द देखील त्यांनी गावच्या सरपंचांना व ग्रामस्थांना दिला आहे.
प्रशासनाच्या सूचनेचा आदर करत पाटण गावातील नागरिकांनी गाव खाली केले व हाच डाव साधत चोरट्यांनी गावावर डल्ला मारला. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे दरम्यान गावातील पंधरा ते वीस घरांमध्ये चोरट्यांनी कडे तोडत चोऱ्या केल्या आहेत. गावात नागरिक नसताना पोलिसांनी या ठिकाणी कर्मचारी ठेवून ग्रस्त घाणे गरजेचे होते अशा भावना नागरिकांनी व्यक्त केले आहेत. नैसर्गिक आपत्ती व सुलतानी संकट अशा परिस्थितीमध्ये पाटण ग्रामस्थ अडकले आहेत. गावामध्ये येण्या जाण्यासाठी योग्य प्रकारे रस्ते देखील उपलब्ध नाहीत. वनविभागाने रस्त्याचे काम थांबवल्यामुळे शंभर मीटर अंतरावर रस्ता रखडला आहे. मळवली रेल्वे स्टेशन जवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे याकरिता नागरिकांना पर्यायी सेवा रस्ता बनवून देण्यात आला होता तो देखील वाहून गेला आहे. चारही बाजूने पाटण ग्रामस्थांची कोंडी झाल्यामुळे ग्रामस्थांना दुर्घटना घडली त्यावेळी वेळेमध्ये मदत देखील उपलब्ध झाली नाही अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत.
पाटण गावावर एवढे मोठे संकट ओढवून देखील महाराष्ट्र शासनाकडून दरडग्रस्तांना कोणतीही तातडीची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. शासनाने दरडग्रस्तांना तातडीची नुकसान भरपाई द्या, चोरीच्या घटनेमुळे नागरिकांचे झालेले नुकसान भरून द्यावे, पाटण गावाचे पुनर्वसन करावे अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य दिपाली हुलावळे, मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके यांच्यासह पंचायत समितीचे विविध सदस्य, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी देखील नागरिकांची भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या व लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊ असे आश्वासन दिले. लोणावळा ग्रामीण पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, डॉग्स कोड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झाले असून पाटण गावात चोरीच्या घटनेचा मागमूस घेत आहेत.






















